Pune ZP Election 2017 Winner List : राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल आता ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटासाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागणार असल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र, याचं चित्र ९ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २०१७ च्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेत नेमकं काय घडलं होतं? कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या होत्या? पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता आली होती? याविषयीची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात.
२०१७ साली निकाल काय लागला होता?
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ७५ पैकी ४४ जागांवर विजय संपादन करत निर्विवाद बहुमत मिळवलं होतं. १३ पैकी आठ पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं होतं. जिल्हा परिषदांमध्ये प्रथमच मोठी ताकद लावलेल्या भारतीय जनता पक्षाने सात जागांवर विजय मिळविला होता.
१३ जागा मिळवून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. शिवसेनेने तीन पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व मिळवले होते, तर भाजप व काँग्रेसने प्रत्येकी एका पंचायत समितीमध्ये वर्चस्व सिद्ध केले होते. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेगाव, शिरूर, मुळशी, हवेली, दौंड, भोर, बारामती आणि इंदापूर या पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवलं होतं. जुन्नर, पुरंदर, खेडमध्ये शिवसेनेने, तर मावळात भाजपा आणि वेल्हे येथे काँग्रेसने यश मिळविलं होतं.
२०१७ मध्ये जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या?
-राष्ट्रवादी काँग्रेस- ४४
-शिवसेना- १३
-भारतीय जनता पक्ष- ७
-काँग्रेस- ७
-राष्ट्रीय समाज पक्ष- १
-इतर- ३
पंचायत समिती निकाल
-राष्ट्रवादी काँग्रेस-७८
-शिवसेना-३२
-भारतीय जनता पक्ष-१७
-काँग्रेस-१६
-लोकशाही क्रांती आघाडी-२
-राष्ट्रीय समाज पक्ष-१
-इतर-४
