पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे यांची, तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार विजयसिंह शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मंगेश काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जगदाळे आणि वळसे पाटील यांच्या विजयाची घोषणा केली.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) कायम राहिले असून, जगदाळे आणि वळसे पाटील यांच्या निवडीमुळे दौंड आणि आंबेगाव तालुक्याकडे ही पदे आली आहेत. चार वर्षांनंतर जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळाले असून ,येत्या काही दिवसांमध्ये विषय समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची विशेष सभा झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती या वेळी उपस्थित होते.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी एकत्रित लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) काही उमेदवारांनी ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडूक लढविली. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अध्यक्ष म्हणून दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची नावे निश्चित केली. त्यानंतर या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात अनुक्रमे विजयसिंह शिंदे आणि मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे जगदाळे आणि वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

जगदाळे दोन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष

जगदाळे हे जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर त्यांनी तो मागे घेतला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत खडकी-देऊळगाव राजे या गटातून ते निवडून आले होते. भाजप उमेदवाराचा पराभव केल्यानंतर ते तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले. विवेक वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्यातील असून त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. विवेक यांचे आजोबा, माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनीही जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले आहे.