Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश होता.

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी जवळपास ५२८ उमदेवार रिंगणात होते. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलेलं होतं.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल ३९ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत ३७ चा बहुमताचा आकडा पार केला आहे.

राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा केला पार

भाजपा- ८
शिवसेना- ४
राष्ट्रवादी (अजित पवार)-३९
राष्ट्रवादी (शरद पवार)-१
शिवसेना ठाकरे गट- ३
काँग्रेस-०
अपक्ष ०

मागील निवडणुकांचा कल काय होता?

२००७ : पुणे जिल्हा परिषदेत २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व राखलं होतं. ७५ जागांपैकी ४५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकत बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला १३, शिवसेनेला ६, भाजपाला केवळ २, जनता दलाला २, तर ७ अपक्ष सदस्य निवडून आले होते.

२०१२ : २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकत पुन्हा एकदा आघाडी घेतली होती. काँग्रेसला या निवडणुकीत ११ जागा मिळाल्या, तर शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाची कामगिरी मात्र तुलनेने मर्यादित राहिली होती, केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.

२०१७ : २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहिला होता. त्यांच्या जागांची संख्या ४३ एवढी झाली. काँग्रेसने ७ जागांपर्यंत मजल मारता आली. शिवसेनेला १४ जागा मिळाल्या, तर भाजपाची कामगिरी ७ जागांवर पोहोचली. यावर्षी जिल्हा परिषदेच्या गट कमी होऊन ७३ झाले आहेत. कोण किती जागा मिळवणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील २०१७ मध्ये पक्षीय बलाबल कसं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेस-४२
काँग्रेस-७
शिवसेना-१४
भाजपा-७
लोकशाही क्रांती दल-१
रासप -१
अपक्ष -२

बातमी अपडेट होत आहे.