पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान करणाऱ्या सहा जणांना पकडले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले. नगर रस्त्यावरील केसनंद भागात असलेल्या एका मतदान केंद्रावर ही घटना घडली.
या प्रकरणी एका महिलेसह सहा जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी बांधकाम मजूर आहेत. ते सध्या केसनंद भागातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहायला आहेत. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. तीन जणांची मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसंनी सहा जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. उर्वरित तीन आरोपी वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करत आहेत.
