पुणे : ‘‘जेन झी’ला फारसे काही समजावून सांगावे लागत नाही. त्यांची स्वतःची मतप्रणाली तयार आहे. त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,’ असे मत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पवार यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती जितेंद्र बडेकर, अमोल नलावडे, अंकिता पाटील, दीपाली हुलावळे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी, तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील तीन विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची तयारी, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी ‘एआय’साक्षर होणे गरजेचे आहे. शिक्षण हे सर्वांत मोठे शस्त्र असून, शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या पद्धतीत बदल झाला असून, काळानुसार शिक्षकांनी बदल स्वीकारून शालेय पातळीपासूनच स्पर्धेच्या युगात कसे टिकून राहायचे, याचे शिक्षण मुलांना दिले पाहिजे. शिक्षकांना स्पर्धेच्या युगात अधिक सक्षम होता यावे, यासाठी ‘ग्लोबल गुरुजी’, ‘परदेशी भाषा शिकण्याची संधी’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’
‘जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये,’ असा सल्लाही त्यांनी दिला.‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, ही जिल्हा परिषदेची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, त्यांच्या चांगल्या कामाचे नेहमीच मूल्यमापन केले जाईल,’ असे जगदाळे यांनी सांगितले.
उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी जिल्ह्यातील बिबट्याप्रवण क्षेत्रातील शाळांना संरक्षक भिंती बांधण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांबरोबरच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतर्फे मिशन ३००, ग्लोबल गुरुजी, शिक्षक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण, बालकुमार साहित्य संमेलन, मुलींसाठी सायकल बँक, बालसंसद हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील एक हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’
‘जिल्ह्यातील ३०३ जिल्हा परिषद शाळांचा ‘मॉडेल स्कूल’च्या माध्यमातून कायापालट झाला. पुढील काळात जिल्ह्यातील एक हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक पाठबळ देण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
