पुणे : शिक्षक दिनाच्या औचित्याने पुणे जिल्हा परिषदेच्या ‘ग्लोबल गुरुजी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सिंगापूर प्रशिक्षण दौऱ्यासाठी पात्र शिक्षकांची निवड जाहीर करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांतील ४५ शिक्षक, ३ केंद्रप्रमुखांची निवड करण्यात आली असून, सिंगापूर दौऱ्यातून या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक पद्धती, नवोपक्रम, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, आधुनिक अध्यापन तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

जिल्हा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता, कौशल्यविकास आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवांना चालना देण्यासाठी ‘ग्लोबल गुरुजी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. टाटा समाजशास्त्र संस्थेच्या सहाय्याने ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाची निवड प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या फेरीत जिल्हा परिषदेच्या पुणे जिल्ह्यातील ११८७ कार्यरत शिक्षकांची ९ ऑगस्ट रोजी १३ केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षेनंतर १५० शिक्षकांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. तसेच, तालुकानिहाय प्रतिनिधित्व आणि उपलब्ध व्यावसायिक पुरावे अशा बहुस्तरीय प्रक्रियेतून ५ शिक्षक, ३ केंद्रप्रमुखांची सिंगापूर प्रशिक्षण दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातून नितीन बर्वे, सावकार अरगडे, कामिनी थोरात, बारामती तालुक्यातून सुगत टोपरे, पंढरीनाथ कामठे, प्रीतम सातपुते, प्रवीण कुलकर्णी, भोर तालुक्यातील स्वाती महानगरे, मारुती चौधरी, सुवर्णा कापरे, दौंड तालुक्यातील अमर खेडेकर, दत्तात्रय बारवकर, आदिनाथ बनकर, सीमा महाडिक, सोनाली गायकवाड यांची निवड झाली. हवेली तालुक्यातील शंकर बडे, सुवर्णा पवार, इंदापूर तालुक्यातील दत्तात्रय शिंगाडे, सागर भोसले, दत्तात्रय शिंगाडे, संदीप येवले, जुन्नर तालुक्यातील नीलेश टिकेकर, धनश्री दाते, रश्मी डुंबरे, अमर केदारी, खेड तालुक्यातील अनिता परदेशी, सुनील मापारी, शीतल पाचारणे, दीपक रेटावडे, मंगल काटले, विशाल बार्वेकर, मावळ तालुक्यातील मावळ मनीषा उघडे, दीपाली अंगिर, मैना सरवदे, श्रीनिवास शिंदे, मुळशी तालुक्यातील उज्ज्वला नारायणकर, माधवी चिंबालकर, पुरंदर तालुक्यातील चंद्रकांत घरमालकर, विद्या म्हेत्रे, शिरूर तालुक्यातील अर्चना जगताप, संतोष वेताळ, गणेश वाढे, मीनाक्षी अनोसे, राजगड तालुक्यातील शीतल जाधव, पुरुषोत्तम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तर आंबेगाव येथील अंकुश बढे, जुन्नर येथील कमलाकांत मुंढे, बारामती येथील शोभा होळकर या केंद्रप्रमुखांना संधी मिळाली.

अन्य शिक्षकांनाही प्रशिक्षण

ग्लोबल गुरुजी उपक्रमातील सिंगापूर प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा अन्य शिक्षकांनाही मिळणार आहे. सिंगापूर प्रशिक्षणातून परतल्यानंतर निवड झालेले शिक्षक व केंद्रप्रमुख ‘शिक्षण दूत’ म्हणून काम करणार आहेत. प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान, अनुभव, नवोपक्रम व प्रभावी अध्यापन पद्धती संबंधित तालुक्यातील शिक्षकांपर्यंत डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

ग्लोबल गुरुजी उपक्रमाकडे केवळ प्रशिक्षण दौरा म्हणून न पाहता, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीची एक व्यापक चळवळ म्हणून पाहणे आवश्यक आहे. सिंगापूरमधून मिळणारे ज्ञान आपल्या तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावी वापर करणे महत्त्वाचे आहे.- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद