पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वैज्ञानिक जिज्ञासेला आणि गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातर्फे राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून १०० विद्यार्थ्यांची नासा, इस्रो, युरोपीयन स्पेस एजन्सी अशा संस्थांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात नासा भेटीसाठी २५, युरोपीयन स्पेस एजन्सीच्या भेटीसाठी २५, तर इस्रो भेटीसाठी ५० विद्यार्थ्यांना निवडण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने या बाबतची माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी नासा, इस्रो भेटीचा उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातून २५ विद्यार्थ्यांना नासा, २५ विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली. यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आयुका’मार्फत तीन टप्प्यांत निवडप्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक भागातील विद्यार्थी संख्या तसेच परीक्षेला प्रत्यक्ष बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन निवडीचे प्रमाण निश्चित करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समतोल संधी, न्याय मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी एकूण २३६६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. १९२५४ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीची परीक्षा दिली. पहिल्या फेरीतील कामगिरीच्या आधारे दुसऱ्या फेरीसाठी १६५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची एमकेसीएलच्या ६६ केंद्रांवर संगणक आधारित परीक्षा घेण्यात आली. त्यातून विद्यार्थ्यांची निवड करून आयुकाच्या तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन विद्यार्थी निवडण्यात आले. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा, विषयाची समज, विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास अशा निकषांवर निवड करण्यात आली.
विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम
निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या आणि इस्रो, नासा, युरोपीयन स्पेस एजन्सी भेटीसाठीच्या अंतिम यादीत स्थान मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमातून संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे शैक्षणिक भेटीची संधी दिली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांना विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना देशातील सीमावर्ती राज्यांना भेट देऊन तेथील संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि सामाजिक विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तालुकानिहाय निवड झालेले विद्यार्थी
आंबेगाव ९
बारामती ५
भोर ८
दौंड ६
हवेली १०
इंदापूर ६
जुन्नर ५
खेड १३
मावळ ७
मुळशी ६
पुरंदर ४
शिरूर १६
वेल्हे ५
