scorecardresearch

कागदविरहित वीजबिल घेण्यात राज्यभरात पुणेकर आघाडीवर; महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये ७५ हजार पुणेकर सहभागी

छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून वीजबिल मिळविणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणेकरांनी राज्यात आघाडी घेतली आहे.

पुणे : छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून वीजबिल मिळविणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणेकरांनी राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे ७५ हजार पर्यावरणस्नेही ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे. गेल्या सव्वावर्षांत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सुमारे ३० हजार ८०० ग्राहकांचा सहभाग वाढला आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ किंवा ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेळेआधी वीजबिल भरण्याचा लाभही घेता येतो. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या  http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत पिंट्र करण्याची सोय आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील ४० हजार ६६४ तर पिंपरी-चिंचवड शहरातील २२ हजार २४४ तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली ग्रामीणमध्ये ११ हजार ८७९ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ई-मेल व एसएमएसला पसंती देत पर्यावरणपूरक योजनेत सहभाग घेतला आहे.

‘गो ग्रीन’मध्ये सहभाग कसा नोंदवाल

महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती  http://www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि पर्यावरणपूरक योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punekar leads paperless electricity bills across state participate msedcl go green ysh

ताज्या बातम्या