डेक्कन जिमखान्यावरील ‘अप्पा’ची विश्रांती !

डेक्कन जिमखाना क्लबच्या आवारामध्येच १९३२ मध्ये रामचंद्र नागेश भट यांनी छोटेखानी जागेमध्ये हे उपाहारगृह सुरू केले होते.

खिचडी काकडी, मटार उसळ-पाव, इडली सांबार, उडीदवडा सांबार, दहीवडा, डोसा अशा वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाची लज्जत देणाऱ्या डेक्कन जिमखान्यावरील ‘अप्पा’ या उपाहारगृहाने विश्रांती घेतली आहे. शहराच्या खाद्यसंस्कृतीच्या वैभवाचे प्रतीक असलेले आणि पुणेकरांशी नाळ जुळलेल्या या उपाहारगृहातील पदार्थ आता मिळत नसल्याने ‘अप्पाप्रेमीं’चा विरस झाला आहे
डेक्कन जिमखाना क्लबच्या आवारामध्येच १९३२ मध्ये रामचंद्र नागेश भट यांनी छोटेखानी जागेमध्ये हे उपाहारगृह सुरू केले होते. ‘अप्पा’ या टोपणनावाने ते परिचित असल्याने या उपाहारगृहाचे ‘अप्पाचे कँटीन’ असे नामकरण झाले. अगदी १० पैशाला चहा आणि ७० पैशांना इडली सांबारचा आस्वाद घेणाऱ्या पुणेकरांच्या हृदयात थोडय़ाच काळात अप्पांनी स्थान पटकाविले होते. क्लबमध्ये सकाळपासूनच विविध क्रीडाप्रकारांचा सराव करण्यासाठी येणारे खेळाडू, कॅरम आणि अन्य बैठे खेळ खेळण्याबरोबरच गप्पांचा फड रंगविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या उर्वरित गप्पा या अप्पांकडेच न्याहरी करताना होत असत. पुढे श्री आणि शशी ही मुलेदेखील अप्पांना या व्यवसायामध्ये मदत करू लागली.
खवय्यांना पदार्थाचा पुरेपूर आनंद देणाऱ्या या उपाहारगृहाचे अंतर्गत रूप मात्र गेल्या पाऊणशे वर्षांत कधीही बदलले नाही किंवा ते बदलावे असेही भट कुटुंबीयांना वाटले नाही. बाहेरून पाहताना ते सदैव अगदीच जुनाट दिसत असे. ग्राहकांना बसण्यासाठीदेखील लाकडी फळीचे लांबलचक आसन उपाहारगृहात होते. दर रविवारी ‘पार्सल’साठी पुणेकरांची लागणारी रांग हेही या उपाहारगृहाचे एक वैशिष्टय़च म्हणता येईल.
खिका (खिचडी-काकडी), मटार उसळ आणि मसाला वडा ही अप्पांची खासियत होती. वेगळ्या प्रकारचा मसाला पीठामध्ये घालून तळलेला उडीद वडा आणि सांबार असा मसाला वडा यांचा आस्वाद घेण्यासाठी येथे अक्षरश: खवय्यांची झुंबड उडत असे. बसण्यासाठी जागा न मिळालेल्या अनेकांना बाहेरच्या बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवर आडव्या ठेवलेल्या फळीवर डिश ठेवून उभ्यानेच या खाद्यपदार्थाचे सेवन करावे लागत असे. या उपाहारगृहाने आता विश्रांती घेतली असल्याने खवय्यांचे आणि सराव करून क्लबमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंचे पोटपूजा करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण बंद झाले आहे. अचानकपणे बंद झालेले अप्पाचे कँटीन पुन्हा कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेमध्ये बरेच जण आहेत.
जिमखान्यावरील ‘अप्पा’ने विश्रांती घेतली असली तरी त्याच चवीच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद देणारे ‘अप्पा’ या नावाचे एक उपाहारगृह ओंकारेश्वर मंदिरासमोर सुरू झाले आहे. तेथील आचारी आता येथे काम करीत असल्यामुळे अप्पांकडे मिळणाऱ्या पदार्थाची चव येथेही देता येणे शक्य झाले असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले. संगणक विषयात पदवी घेतल्यानंतर संग्राम या युवकाने पूना बोर्डिग हाऊस येथे उमेदवारी करून नंतर हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे.

अशी होती ‘अप्पा’ची वैशिष्टय़े
– खिचडी काकडी अर्थात खिका
– पत्र्याच्या डब्यात ठेवलेली शेव
– दहीवडय़ाला मोहरीची फोडणी
– साजूक तुपातील शिरा
– स्पेशल मसाल्याची मटार उसळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Punekar will miss now appa hotel