पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने पुणे महापालिकेवर गेल्या चार वर्षापासून प्रशासकराज होते. त्यामुळे पीएमपीसह पुणे स्मार्ट सिटी कंपनीची संचालक पदे रिक्त होती. महापालिका निवडणुका झाल्याने महापालिकेचे सभागृह पुन्हा अस्तित्वात आले आहे. त्यामुळे रिक्त असलेली संचालक मंडळातील सदस्यांची पदे भरण्यात आली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अजय खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे विशाल मलके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता इंगळे या दोन सदस्यांची निवड करण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा नवीन इमारतीमधील सभागृहात झाली. सभापती परशुराम वाडेकर होते. पीएमपी संचालकपदी नगरसेवक खेडेकर यांच्या नावाची शिफारस भाजपकडून करण्यात आली. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. तर स्मार्ट सिटीवर दोन संचालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

स्मार्ट सिटी कंपनीवर महापालिकेचे ६ संचालक नामनिर्देशित असतात. यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते हे पदाधिकारी पदसिद्ध असतात. तर, दोन सभासदांची मुख्य सभेत संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, हे दोन सदस्य जे पदाधिकारी राजकीय पक्षांचे आहेत. ते पक्ष वगळून राष्ट्रीय, राज्य मान्यताप्राप्त दोन राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एक या प्रमाणे निवडले जातात.

महापालिकेत काँग्रेसला १५ जागा मिळालेल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने स्वतंत्र नोंदणी केल्याने त्यांना तीन जागा मिळालेल्या आहेत. त्यानुसार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ही संधी देण्यात आली.

‘पीएमपी’च्या कारभारावर होणार विशेष सभा

‘पीएमपी’च्या कारभारात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला. ‘पीएमपी’च्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करून काँग्रेसने सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. ‘महापालिका पीएमपीला तुटीपोटी ६० टक्के रक्कम देते, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के रक्कम देते.

‘पीएमपी’च्या गैरव्यवहाराचे उत्तर देण्यासाठी कोणताही अधिकारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहत नाही. पीएमपीच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण बोलवावी,’ अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. त्यावर ‘पुढील काही दिवसांत ही विशेष सभा बोलाविली जाईल,’ असे आश्वासन महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले.