पाऊलवाट जाऊन त्या ठिकाणी रस्ता आला, की आपोआप प्रगतीचा, विकासाचा मार्ग खुला होतो; पण या वाटेत अतिक्रमणांचे काटे पसरले, की रस्त्यांचीच ‘वाट’ लागते. पुण्याची अवस्था अगदी तशीच झाली आहे. रस्ते आहेत; पण अतिक्रमणांनी वेढलेले. अतिक्रमणांचा हा विळखा इतका घट्ट होत गेला की ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘सायकलींचे शहर’ ही पुण्याची बिरुदे मागे पडली आणि दुर्दैवाने ‘सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर’ अशी नवी ओळख झाली.
‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेच्या २०२५ च्या अहवालानुसार, पुणे शहर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर ठरले. कारण, पुण्यात १० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी साधारणत: ३३ मिनिटे २२ सेकंद लागतात. पुण्याची ही अशी ओळख झालेली असताना, ही प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेने सुरू केला. रस्त्यांवर असलेल्या एकूण वाहनांच्या संख्येपैकी सुमारे ८० टक्के वाहने प्रमुख ३२ रस्त्यांवरून जातात; पण त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. या ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप या ‘मिसिंग लिंक’ जोडता आल्या नसल्याने हे रस्ते ‘मिसिंग’च आहेत.
‘मिसिंग लिंक’ जोडण्याची संकल्पना दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आली. त्या वेळी प्रशासकीय कारभार होता. तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नंतर डॉ. राजेंद्र भोसले यांनी विविध कारणांनी रखडलेले रस्ते जोडण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ची योजना महापालिकेच्या अंदाजपत्रकात मांडली. आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही हे रस्ते जोडण्यासाठी केवळ कागदावर योजना न मांडता भूसंपादनासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. हे एक आश्वासक पाऊल म्हणता येईल.
शहरातील हे ३२ मुख्य रस्ते एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी या रस्त्यांवर अतिक्रमणे झालेली असल्याने ती काढून जागा ताब्यात घेणे आव्हानात्मक आहे. सद्य:स्थितीनुसार या ‘मिसिंग लिंक’च्या जागांपैकी ११ जागा ताब्यात घेण्यात आल्या असून, चार मिसिंग लिंकच्या जागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. या वर्षीच्या अंदाजपत्रकात आणखी १२ ‘मिसिंग लिंक’च्या जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पथ विभागाच्या रोड ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीमच्या (आरएमएस) सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, तीन मीटर ते ६० मीटर रस्त्यांची लांबी सुमारे २२७३ किलोमीटर आहे. त्यापैकी महत्त्वाच्या ३२ मुख्य रस्त्यांची लांबी २७० किलोमीटर आहे. शहरातील वाहनांपैकी सुमारे ८० टक्के वाहने या प्रमुख रस्त्यांवरून ये-जा करत असतात. मात्र, अतिक्रमणे आणि अन्य कारणांमुळे हे रस्ते एकमेकांना जोडले गेलेले नाहीत. हे रस्ते एकमेकांना जोडल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी ‘मिसिंग लिंक’ची संकल्पना मांडण्यात आली.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील ३२ ‘मिसिंग लिंक’पैकी १२ रस्त्यांवरील जागा या वर्षी ताब्यात घेऊन रस्ते विकसित करण्याचे नियोजित केले आहे. यापूर्वी या रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात येत नव्हती. मात्र, या वर्षीच्या अंदाजपत्रकात भूसंपादन करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
पुण्यातील रस्त्यांचे जाळे दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे शहर अशी पुणे शहराची प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ जोडून रस्त्यांचे जाळे १०.७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रस्त्याचे जाळे विकसित करण्याबरोबरच अस्तित्वातील रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यावर भर दिला जाणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी रस्त्यांचे जाळे विस्तारणे हा खात्रीशीर मार्ग आहे. कोणत्याही विकसित आणि गतिमान शहरासाठी हे प्रमाण किमान १५ ते २० टक्के असणे अपेक्षित असते. मात्र, हे प्रमाण कमी असल्याने पुण्यावर वाहतूक कोंडीचे शहर हा शिक्का बसला आहे.
केवळ नवीन रस्ते बांधून वाहतूक कोंडी सुटत नसते, तर अस्तित्वातील रस्त्यांची दुरवस्था असल्यास कोंडीत भर पडते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे महापालिकेने आता अस्तित्वातील रस्त्यांच्या नियमित देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवले आहे. पुणे शहराच्या हद्दीत ३२ गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या गावांच्या प्रादेशिक विकास आराखड्याचे अवलोकन करून ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता तयार करण्याचेही नियोजन या अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. ‘वाहतूक कोंडीचे शहर’ ही नकारात्मक ओळख पुसून ‘स्मार्ट पुणे’ अशी प्रतिमा निर्माण होण्यासाठी ‘मिसिंग’ रस्ते ‘लिंक’ करण्याशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी भाजपकडून आगामी काळात हे काम केले जाईल आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
sujit.tambade@expressindia.com
