पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी पाचशेहून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ३० शैक्षणिक संस्थांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत.

युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार महाकुंभ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू यामागे आहे. या उपक्रमातून युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्योग व विविध आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि शासन, उद्योग-आस्थापना तसेच रोजगार इच्छुक युवक-युवती यांना एकाच मंचावर आणणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध उद्योग आणि आस्थापनांचा सहभाग राहणार आहे. या आस्थापनांकडून विविध शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराच्या स्वरूपानुसार रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’ हा त्याचाच एक भाग असून, युवक आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (रास्ता पेठ, पुणे) येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ असून, रोजगारविषयक माहितीसाठी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी व्हावे. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना, त्यांच्या कौशल्याला व पात्रतेला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुरेश वराडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग