पुणे : महावितरणच्या वीजयंत्रणेला आग लागल्याने सदाशिव पेठेतील साडेपाच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (२८ एप्रिल) विस्कळीत झाला होता. त्यातील बहुतांश वीजग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीच पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला. मात्र, आगीत संपूर्ण वीजयंत्रणा जळल्याने सुमारे चारशे वीजग्राहकांचा वीजपुरवठा २५ तासांनंतर सुरू झाला.
वाढलेल्या तापमानामुळे सदाशिव पेठेतील अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज येथे महावितरणच्या वीजयंत्रणेला सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत रिंग मेन युनिट (आरएमसी) जळाले. वीजयंत्रणेत मोठा बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या पर्वती विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले.
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बहुतांश ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र, एका रोहित्रावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे परिसरातील सुमारे चारशे वीजग्राहकांचा वीजपुरवठा २५ तासांहून अधिक वेळ खंडित होता. परिणामी, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. दैनंदिन कामांचा खोळंबा झाला.
‘वीजेसारखी अत्यावश्यक सुविधा पुरवताना पायाभूत सुविधांची सातत्याने देखभाल-दुरूस्ती आणि बिघाड होण्यापूर्वीच सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. आग लागलेले महावितरणचे आरएमसी युनिट अत्यंत बंदिस्त जागेत आहे. मोकळ्या हवेला तिथे जागा नाही. परिणामी, तापमान वाढून वीजयंत्रणेला आग लागण्याची शक्यता वाढते. अशा घटना याच रोहित्राजवळ बऱ्याचवेळा घडलेल्या आहेत. आता किमान पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,’ असे वीज कंत्राटदार असलेले आणि या परिसरातील रहिवासी मंदार पूर्णपात्रे यांनी सांगितले.
‘अशा घटनांमुळे महावितरणच्या यंत्रणेवरही ताण येतो. कर्मचारी, अभियंत्यांना रात्रभर दुरुस्तीचे काम करावे लागते. त्यांच्याकडून तत्परतेने प्रतिसाद देण्यात येतो. मात्र, वरिष्ठ पातळीवर योग्य नियोजन आणि पायाभूत सुविधांबाबत एकूण सर्वच यंत्रणांमध्ये असलेल्या उदासीनतेमुळे नागरिक वेठीस धरले जातात. यात लाईनमन किंवा त्या अभियंत्याच्या दोष नसतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीची कामे वेळच्या वेळी करण्यात येतात. मात्र, वाढलेल्या तापमानामुळे आग लागण्याची घटना घडली. या आगीत सगळी वीजयंत्रणा जळाली. त्यानंतर तातडीने पर्यायी मार्गाने परिसरातील बहुतांश ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला,’ असे महावितरणच्या पर्वती विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरळीत करण्यात आला असून, विजयंत्रणेतील बिघाड दुरूस्त करण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत.
वीजेच्या तक्रारींसाठी संपर्क
उन्हाळ्याच्या दिवसात विविध कारणांनी तक्रारींची संख्या वाढतात. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंबंधी अडचण असल्यास थेट वीज कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना फोन न करता २४ तास कार्यरत असलेल्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल द्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
