पुणे :  मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकाविणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला शनिवारवाडा आज भग्नावस्थेत उभा आहे.  १८२८ साली लागलेल्या भीषण आगीत शनिवारवाड्याचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर त्याचे मूळ वैभव हरपले. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन, जतन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सात मजली उभारावा, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली आहे.

शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवारवाड्याचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी पुन्हा सात मजली शनिवारवाड्याची वास्तू निर्माण झाली पाहिजे, अशी भूमिका आमदार रासने यांनी सभागृहात मांडली. 

कसबा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे आमदार रासने यांनी विधानसभा सभागृहातील सभासदांचे लक्ष वेधले. शनिवारवाडा–स्वारगेट तसेच सारसबाग–शनिवारवाडा या प्रस्तावित भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करून पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणावा, तसेच मामलेदार कचेरी परिसरात थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी रासने यांनी केली.

शहराचा मूळ गावठाण भाग असलेल्या कसबा मतदारसंघात शेकडो जुने वाडे आहेत. मात्र युडीसीपीआर नियमावलीतील काही जाचक अटींमुळे या वाड्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारवाड्याच्या आजुबाजुच्या परिसरात राहणाऱ्या इमारतींना पुर्नविकास करताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत.

या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने या नियमावलीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच मतदारसंघातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असल्याची भूमिका रासने यांनी विधानसभेत मांडली.

मुख्यमंत्र्यांचे काम महाराष्ट्र घडविण्याचे

त्रिशूल चित्रपटात नायक असणाऱ्या अमिताभ बच्चन प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि धडाडीच्या बळावर प्रगती करून दाखवली. त्याचप्रमाणे १९८३ च्या विश्वचषकात कठीण परिस्थितीत नाबाद १७५ धावांची तडाखेबाज खेळी करत कपिल देव यांनी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच धर्तीवर आव्हानात्मक परिस्थितीतही ठाम नेतृत्व आणि दूरदृष्टीच्या बळावर विकसित महाराष्ट्र घडवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची भावना यावेळी हेमंत रासने यांनी व्यक्त केली.