पुणे : शहराचा पश्चिम ते दक्षिण भाग जोडण्यासाठी वाकड-कात्रज-शेवाळवाडी असा मेट्रोचा मार्ग सुरू करता येईल का? याची चाचपणी महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाने ‘महामेट्रो’ला पत्र दिले असून, प्रस्तावित मार्गांचा सर्वंकष वाहतूक आराखड्यात समावेश करता येईल का, याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
कात्रज ते देहूरोड या बाह्यवळण महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत आहे. या रस्त्याचा वापर करणाऱ्या लहान तसेच अवजड वाहनांची संख्यादेखील गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी या महामार्गालगत मेट्रो प्रकल्प करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.
या मागणीचा विचार करून काही दिवसांपूर्वी ‘महामेट्रो’ने महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता. त्याला उत्तर देताना महापालिका प्रशासनाने प्रथमच या मार्गाची गरज आणि व्यवहार्यता तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतरच याबाबतचा सविस्तर निर्णय घेणे योग्य ठरणार असल्याचे म्हटले आहे.शहरासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बसची संख्या, विविध भागांत मेट्रो मार्गांचा विस्तार, पूल, रस्ते प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे. वाकड-कात्रज-शेवाळवाडी असा मेट्रोचा मार्ग करायचा झाल्यास या मार्गावरील प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज, तांत्रिक अडचणी, भूसंपादनाची आवश्यकता आणि वाहतूक कोंडीवरील परिणाम या सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
या मार्गाबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास पुढील टप्प्यात प्रत्यक्ष स्थळपाहणी, वाहतूक मोजणी, तांत्रिक सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिकेने ‘महामेट्रो’ला पत्र पाठवून सविस्तर तपासणी करून या मार्गांची व्यवहार्यता तपासण्यात सांगितले आहे. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी ही माहिती दिली.
गोजारे म्हणाले, ‘वाकड, कात्रज तसेच देहूरोड या महामार्गावर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येतही भर पडलेली आहे. कात्रज-शेवाळवाडी-वाकड असा मेट्रोचा नवीन मार्ग सुरू झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र, कोणताही अंतिम निर्णय हा सर्वंकष वाहतूक आराखड्यातील तपासणीच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे.’
शहराच्या चारही दिशांना मेट्रो होणार
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावित आहे. पुणे शहरात सध्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका, वनाज ते रामवाडी या दोन मार्गावर मेट्रो सुरू आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जात असून हा मार्ग कात्रज ते निगडी असा होणार आहे. तसेच वारजे पासून चांदणी चौक, रामवाडी येथून विमानतळ असाही मेट्रो मार्ग केला जाणार आहे. मेट्रोने प्रवास करणे सोयीचे आणि सुरक्षित असल्याने मेट्रोला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाणार आहे.
