माध्यमे ही केवळ नागरिकांची नाही तर ग्राहकांसाठीचीही भूमिका मांडतात. त्यामुळे नागरिकांच्या आणि देशापुढच्या समस्या दुर्लक्षित राहताना दिसून येतात. या देशामध्ये बातम्यांची नाही तर खऱ्या बातम्या शोधणाऱ्यांची कमतरता आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी रविवारी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आयोजित व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यान गुंफताना ‘न्यूज टेलिव्हिजन की क्रेडिबिलिटी बढी है, या कुछ बची है’ या विषयावर वाजपेयी बोलत होते. असोसिएशनचे सचिव अरुण म्हेत्रे या वेळी उपस्थित होते.
लोकशाहीच्या सर्वच स्तंभांपुढे विश्वासार्हतेचे संकट उभे राहिले आहे. त्यातून भारतीय समाज हा चांगल्या आणि वाईट गोष्टींची निवड ही माध्यमांच्या मदतीनेच करतो, याकडे लक्ष वेधून वाजपेयी म्हणाले, नागरिकांचे विषय किंवा त्यांना अपेक्षित असलेल्या बातम्या या लोकांसमोर येत नाहीत. राजकीय नेते पोहोचू शकत नाहीत तेथपर्ययत माध्यमांनी पोहोचायला हवे. मतपेढय़ांचा विचार करणारे राजकीय पक्ष आणि नफा व टीआरपी याचा विचार करणारी माध्यमे नागरिकांकडे ग्राहक म्हणूनच पाहतात. बातमीसाठी माध्यमांना पंतप्रधान कार्यालयापासून ते झोपडपट्टीपर्यंत कोठेही वावरण्याची संधी असते. एवढय़ा मोठय़ा कार्यक्षेत्रातून केवळ आपल्या गरजेप्रमाणे निवडलेल्या बातम्याच माध्यमांकडून पुढे आणल्या जातात. माध्यमांचे धोरण काहीही असले, तरी आपण पत्रकार म्हणून वैयक्तिक स्तरावर उत्तम प्रकारे काम करू शकतो.
मयूरेश कोण्णूर यांनी सूत्रसंचालन केले. प्राची कुलकर्णी यांनी आभार मानले.