पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आत्तापर्यंत ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यास ६० टक्के शेतकऱ्यांनी मान्यता दिली असून भूसंपादनापोटी आत्तापर्यंत ९०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, येत्या दहा जून भूसंपादनाची अंतिम मुदत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचा अंतिम दरही निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर किमान एक कोटी ६१ लाख रुपये मिळणार आहेत. घर, फळबागा, बोअरवेल, बाधित घरांचा विचार करता जमिनीच्या मूळ दराच्या चौपटीपेक्षा दरानुसार सरासरी प्रति एकर दोन कोटी रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मोबदल्याचे सूत्र निश्चित झाल्यानंतर सात मे पासून भूसंपादन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यात कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मोबदल्याची रक्कम जमा करण्यास करण्यात येत आहे. या प्रक्रियेने गेल्या दिवसांत वेग घेतला आहे. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
‘वनपुरी येथील २६५ शेतकऱ्यांनी ११८ हेक्टर, उदाचीवाडी येथील ५९ शेतकऱ्यांनी २४ हेक्टर, कुंभारवळण येथील २५० शेतकऱ्यांकडून ११२ हेक्टर, पारगाव येथील ५८० शेतकऱ्यांकडील १०० हेक्टर, एकतपूर येथील २८८ शेतकऱ्यांकडून १४६ हेक्टर तर खानवडी आणि मंजुवडी येथील अनुक्रमे २६० आणि १७५ शेतकऱ्यांकडून १५० आणि ६५ हेक्टर क्षेत्रा संपादित करण्यास मान्यता देण्यात आली असून आत्तापर्यंत ९०० कोटींच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे,’ असे डुडी यांनी सांगितले.
विमानतळासाठी एकूण १२१६ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्यानुसार ७३५.२५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यास मान्यता मिळाली आहे. येत्या दहा जूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.
