पुणे : ‘सिव्हिल एव्हिएशनचा उपाध्यक्ष असताना पुरंदरच्या विमानतळासाठी जागेची निवड मीच केली. ती नदीकाठची जागा पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याची माहिती दिली. या जगाकडे आकाशातून पाहिले तर, देवानेच विमानतळासाठी तिची निर्मिती केली असावी, असे वाटते. मुख्यमंत्र्यांनीही या जागेला मान्यता दिली,’ असा दावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी केला.

पुणे नगर वाचन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह स्वाती ताडफडे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात गिरीधर साठे यांना वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, रूपाली पाठक यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता आणि डॉ. दत्तात्रय डुंबरे यांना संत साहित्य विषयक आदर्श ग्रंथलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाटील म्हणाले,‘मराठीकडे राज्यकर्त्यांनी, शासनाने दुर्लक्ष केले. तसेच मराठी भाषकांच्या दुर्लक्षामुळेच मराठीचे नुकसान झाले. आता मात्र मराठीच्या संवर्धन संरक्षणासाठी प्रयत्न व्हायला हवेत. झेंडा कोणताही असो त्याचा दांडा मराठीचाच असायला हवा. ग्रंथालये विचार, संस्कृती पुढे नेतात. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी इथली ग्रंथालये जपली पाहिजेत. या दुर्लक्षित घटकाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.’

‘पटसंख्येच्या निकषावर प्राथमिक शाळा बंद करण्यात येत आहेत. मात्र, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच मिळाले पाहिजे. गेल्या पन्नास वर्षात मराठी शाळेतून शिकलेल्या शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवला. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीजा शास्त्रज्ञांमध्ये सुमारे ५० टक्के शास्त्रज्ञ हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी भाषेतून शिकले. तसेच पंच्याण्णव टक्के नोबेल पुरस्कार विजेते हे मातृभाषेतूनच शिकले. त्यामुळे पटसंख्येच्या निकषांवर प्राथमिक शाळा बंद करु नयेत,’ असेही पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मातृभाषेच्या संवर्धनासाठी एकजुटीचे आवाहन केले. त्यांनी साहित्य संमेलनातून मराठीच्या संवर्धनासाठी झालेल्या प्रयत्नांची दखलही घेतली. यंदाचे साहित्य संमेलन सर्वसामावेशक होते. या संमेलातून मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी भाषकांच्या विविध प्रश्नांची उकल करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचा उहापोह विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात केला.

‘पुणे नगर वाचन मंदिराच्या माध्यमातून मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सातत्याने काम करण्यात येत आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या सुमारे सहा हजार वाचकवर्ग आणि सव्वा लाखांहून अधिक ग्रंथसंपदा संस्थेत उपलब्ध आहेत,’ अशी माहिती ताडफडे यांनी दिली. विविध वयोगटांसाठी स्वतंत्र पुस्तकसंग्रह उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.