पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के भूखंडांचा परतावा देण्यासाठी विमानतळाशेजारीच सुमारे २४५ हेक्टर क्षेत्रावर ‘एरोसिटी’ची उभारणी करण्यासंदर्भातील अधिसूचना येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, ‘एरोसिटी’च्या जागेसाठीची संमती यापूर्वीच मिळाली असून, त्याचा मोबदलाही तातडीने देण्यात येईल, असे डुडी यांनी स्पष्ट केले.

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून १ हजार २१६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के जमिनीचे करारनामे झाल्याने हे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. भूसंपादन करताना शेतकऱ्यांबरोबर करण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये १० टक्के भूखंड परतावा देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार एकूण क्षेत्राच्या सुमारे १२१ हेक्टर क्षेत्र परताव्यासाठी लागणार आहे. हा भूखंड देताना तो विकसित करून देण्याचे ठरले असल्याने त्यासाठी अतिरिक्त जमीन लागणार आहे. दरम्यान, हा परतावा देण्यासाठी विमानतळाशेजारी ‘एरोसिटी’ विकसित करण्यात येणार आहे. यात हे भूखंड विकसित करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी १२१ हेक्टरची आवश्यकता असताना २४५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. या जमिनीची संपादनासाठी शेतकऱ्यांकडून यापूर्वीच संमती मिळाली आहे, असे डुडी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘या भूखंडाशेजारी प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्यात येईल. रस्त्यांसाठी अतिरिक्त जमीन लागत असल्याने सुमारे दुप्पट क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. ‘एरोसिटी’च्या जमिनीच्या संपादनाबाबत ‘एमआयडीसी’कडून येत्या दोन ते तीन दिवसांत अधिसूचना जाहीर केली जाईल. त्यानंतर करारनामे करून शेतकऱ्यांच्या त्यांच्या बँक खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येईल.’


‘एरोसिटी’साठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना एक दीड महिन्यांत सातबारा उतारा किंवा मालमत्तापत्रक देण्यात येईल. ही ‘एरोसिटी’ आंतरराष्ट्रीय दर्जाची असणार आहे. त्यामुळे भविष्यात या भूखंडाची किंमतही वाढणार आहे.

  • जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी