Purandar Airport Pune Latest News: वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे शहर व परिसरात औद्योगिकरण आणि नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती केली जात असून त्यासाठी आवश्यक जमीनीचे तातडीने भूसंपदान करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा बैठकात फडणवीस बोलत होते. या विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची विशिष्ट पद्धत ठरविण्यात यावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूसंपादनाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. विमानतळ विकासामध्ये सिडको, नगरविकास विभाग यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून भूमिका यशस्वीपणे पार पाडावी. विमानतळ निर्माण झाल्यानंतर हा परिसर डेव्हलपमेंट झोन म्हणून पुढे येणार आहे. त्या अनुषंगाने सिडकोने परिसरात आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनाची अधिसूचना ‘ एमआयडीसी’ने काढावी तसेच निधीची उपलब्धतेबाबत विशिष्ट पद्धत ठरवण्यात यावी. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावात पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गाव निहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रस्तावित क्षेत्रापैकी १२१६ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करावी. या संयुक्त मोजणीचा, हरकतींचा अहवाल सरकारला सादर करण्यात यावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

