जेजुरी : पुरंदर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांनी युती केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे यांची सभापतिपदी, तर शिवसेनेचे प्रवीण जगताप यांची उपसभापतिपदी निवड जाहीर करण्यात आली. या पंचायत समितीच्या आठ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना (शिंदे) आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले.
सभापतिपदी निवडीसाठी आवश्यक असलेले पाच सदस्यांचे बळ कोणाकडे नसल्याने ‘राष्ट्रवादी’ची भूमिका महत्त्वाची होती. ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आमदार विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेबरोबर सत्ता स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘राष्ट्रवादी’ने शिवसेनेबरोबर युती करून उपसभापतिपद देण्याचा निर्णय घेतला.
यंदा सभापतिपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने दिवे गणातून निवडून आलेले अमित झेंडे यांची सभापतिपदी, तर वीर गणातून निवडून आलेले प्रवीण जगताप यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडगे यांनी काम पाहिले.
