लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कुरिअरद्वारे मेफेड्रोन खरेदी करणाऱ्या ११९ जणांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने सात पथके तयार केली असून, आतापर्यंत ७० जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुण हे उच्चशिक्षित असून, त्यापैकी काही जण हे माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत.
विश्रांतवाडीतील लोहगाव भागात एका सदनिकेत मेफेड्रोनचा साठा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित बेंडे, निमिष आबनावे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी कुरिअरमार्फत मेफेड्रोन घरपोहोच दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुरिअर कंपनीतील कर्मचारी विश्वनाथ कोनापुरे (सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) याला अटक केली. पुण्यातील मेफेड्रोन विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निमिष आबनावे असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आबनावेची चौकशी केली. तेव्हा गुजरातमधील मेफेड्रोन तस्कर मोहम्मद मर्चंट याने अमली पदार्थ विक्रीस दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मर्चंटला गुजरातमधून अटक केली.
आणखी वाचा-डॉक्टरांच्या संघटनांत महिलांना नगण्य स्थान! देशभरातील ४६ पैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा आरोपींनी पुण्यासह राज्य, तसेच परराज्यांतील ११९ जणांना मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यापैकी ७० जणांचे नाव आणि पत्ते पोलिसांना मिळाले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांना कुरिअरद्वारे मेफेड्रोनची विक्री करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
नोटीस बजाविलेले ते ७० जण कोण?
गुन्हे शाखेच्या सात पथकांनी मेफेड्रोन खरेदी करणाऱ्या ७० जणांचा माग काढला. त्यांनी कुरिअरद्वारे मेफेड्रोन मागविले होते. पोलिसांचे पथक त्यांच्या घरी गेले. त्यांना पोलिसांनी नोटीस बजाविली. त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती देण्यात आली. नोटीस बजाविण्यात आलेल्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि उच्चशिक्षितांचा समावेश आहे. काहीजण माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत.
आणखी वाचा-श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात; चार गुन्हे उघड
महाविद्यालयीन तरुणांच्या घरी पोलीस पोहोचताच पालकांना मोठा धक्का बसला. आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करतो, याची पुसटशी कल्पना अनेक पालकांना नव्हती. पोलिसांकडून ७० जणांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तस्करांकडून अमली पदार्थ खरेदी करणाऱ्या उर्वरित ४९ जणांचा शोध घेण्यात येत असून, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.
अमली पदार्थमुक्त मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. अमली पदार्थ तस्करांसह त्यांच्याकडून अमली पदार्थ खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. विश्रांतवाडी अमली पदार्थ प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.-अमितेश कुमार, पोलीस आयुक्त