पुणे : गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू झाला असून किरकोळ बाजारात एक किलो जांभळाचे दर प्रतवारीनुसार ३०० ते ४०० रुपये दरम्यान आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात गुजरातमधील जांभळांची आवक तुरळक प्रमाणावर होत असून पुढील आठवडय़ात जांभळांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या आठवडय़ात गुजरातमधील जांभळांची हंगामातील पहिली आवक झाली. बडोदा भागातून जांभळे पाठविण्यात आली. सध्या बाजारात जांभळांची आवक अपेक्षेएवढी होत नसून दररोज तीन ते चार क्रेट्समधून (प्लास्टिक जाळी) १०० ते १५० किलो जांभळांची आवक होत आहे. पुढील आठवडभरात गुजरातमधील जांभळांची आवक वाढण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जांभूळ आकाराने मोठे असते तसेच चवीला गोड असते, असे मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यात गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू होतो. दोन ते अडीच महिने गुजरातमधील जांभळाची आवक सुरू असते. येत्या काही दिवसात गुजरातसह कर्नाटक, कोकणातील गावरान जांभळांची आवक सुरू होईल. गेल्या वर्षी एक किलो जांभळांना प्रतवारीनुसार ८० ते २५० रुपये असा दर मिळाला होता. हंगाम बहरात आल्यानंतर बाजारात दररोज १५ ते २० टन जांभळांची आवक होईल. आवक वाढल्यानंतर
दरात घट होईल. साधारणपणे प्रतिकिलो ६० ते २०० रुपयांपर्यंत जांभळांना दर मिळतील. असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून जांभळांच्या मागणीत वाढ झाली आहे. जांभळापासून सरबत केले जाते. प्रक्रिया उद्योगांकडून जांभळांना मागणी असते. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवक कमी होत असून पुढील आठवडय़ात बाजारात रोज एक ते दीड टनांपर्यंत जांभळांची आवक होईल.-पांडुरंग सुपेकर, जांभूळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
