शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), व्हीआयआयटी, पीआयसीटी, व्हीआयटी आणि सिंहगड या पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत अभियांत्रिकीचे वर्चस्व गाजविले. यासह बीएमसीसी, फग्र्युसन, गरवारे वाणिज्य आणि इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयांच्या संघांनी ‘नवात’ धडक मारली आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी रात्री उशिरा संपली. १६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ५१ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदा ५१ वे वर्ष आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अभिनेत्री अंजली धारू, लेखक मििलद जोगळेकर आणि कवी डॉ. राहुल देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी ५ आणि ६ सप्टेंबर रोजी भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे. त्यासाठी अभिनेते सचिन खेडेकर, लोकेश गुप्ते आणि नाटय़समीक्षक डॉ. अजय जोशी हे परीक्षक असतील. यंदाच्या स्पर्धेपासून अंतिम नऊ संघांबरोबरच सुमार सादरीकरण करणाऱ्या दहा संघांचीही निवड करण्यात आली असून या संघांना पुढील वर्षीच्या स्पर्धेत प्राधान्याने संधी मिळणार नसल्याचे संयोजकांनी कळविले.