‘प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असल्या तरी त्या जनसंपर्कात कमी पडतात. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करत असतात, हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे,’ असे मत राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी रविवारी व्यक्त केले.
कीर्तन संजिवनी पुष्पलता रानडे महिला राष्ट्रीय पुरस्काराच्या वितरण समारंभात सत्यनारायण बोलत होत्या. यावेळी साहस राष्ट्रीय पुरस्कार अॅड. फ्लेविया अॅग्नेस, संशोधन राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सुमन सहाय यांना प्रदान करण्यात आला. गानवर्धनचे कृ. गो. धर्माधिकारी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. आकांक्षा आणि आनंद देशपांडे यांना जिद्द पुरस्कार देण्यात आला तर भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांना विशेष कला गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका विद्या बाळ, पद्मभूषण डॉ. आर. बी. लेले, सुरेश रानडे आदी उपस्थित होते.
यावेळी सत्यनारायण म्हणाल्या, ‘महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा चंगळवाद आणि संस्काराचा अभाव ही कारणे आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून पुष्पलता रानडे यांनी जे संस्कार दिले, त्याची खऱ्या अर्थाने आज आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रश्नांबाबत एकत्र येणे आणि त्याचबरोबर जनसंपर्क वाढवण्यावरही महिलांनी विशेष लक्ष द्यायला हवे.’
अॅग्नेस म्हणाल्या, ‘महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नवे कायदे येतात. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे महिलांचे प्रश्न सुटत नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत समाजही उदासीन आहे.’’