दर आठवडय़ाला अंमलदारांच्या कामात बदल

पुणे : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंदोबस्त तसेच अन्य महत्त्वाच्या कामाची जबाबदारी ठाणे अंमलदारांवर (डय़ुटी ऑफिसर – डिओ) असते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना ‘डिओं’ची मर्जी सांभाळावी लागते. वारजे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अ‍ॅपद्वारे लाच घेणाऱ्या अंमलदाराची खाबुगिरी उजेडात आल्यानंतर त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अंमलदारांकडून होत असलेले गैरप्रकार थांबविण्यासाठी त्यांच्या कामात दर आठवडय़ाला बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेशही देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातील प्रत्येक अंमलदार आळीपाळीने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळतील. पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाच्या ठिकाणी, सभा, समारंभ, आंदोलनांच्या जागी बंदोबस्त ठेवण्यात येतो तसेच दैनंदिन कामकाजाचे वाटप ठाणे अंमलदाराकडून करण्यात येते. पोलीस ठाण्यांचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक असले, तरी पोलीस ठाण्यांचा कारभार अंमलदारच चालवितो. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमलदारांची सद्दी असते. बंदोबस्त तसेच अन्य कामात सूट हवी असल्यास अंमलदारांना लाचेपोटी पैसे द्यावे लागतात, अशा तक्रारी आहेत. चिरीमिरी घेतल्याशिवाय पोलिसांचे काम अंमलदाराकडून होत नाही, अशाही तक्रारी आहेत. अंमलदाराची मर्जी सांभाळण्यासाठी  दरमहा पोलीस ठाण्यातील कर्मचारी पैसे देतात, असे आरोप पोलीस कर्मचाऱ्यांकडून केले जातात.

वारजे पोलीस ठाण्यातील ऑनलाइन लाचेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील पोलीस ठाण्यांमधील ‘डीओं’कडून होत असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यांची जबाबदारी आळीपाळीने वेगवेगळ्या अंमलदारांवर सोपविण्यात येणार आहे.

ऑनलाइन लाचेचे प्रकरण काय?

वारजे पोलीस ठाण्यातील अंमलदार प्रमोद कोकाटे यांनी पोलीस नाईक बाबासाहेब नराळे यांच्याकडून अ‍ॅपद्वारे पैसे स्वीकारले. कोकाटे यांच्याकडून त्रास दिला जात आहे, अशी नराळे यांची तक्रार होती. नराळे यांनी ऑनलाइन पैसे पाठविल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला होता. कोकाटे यांची परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी नुकतीच चौकशी केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोकाटे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.