पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची गरज कशी?; लेखिका मंगला आठलेकर यांचा सवाल

नोकरीसाठी, आर्थिक मदतीसाठी, सरकारी कोटय़ातून घर मिळावे यासाठी अर्ज करावा लागणे समजू शकते.

लेखिका मंगला आठलेकर यांचा सवाल

पुणे : राजकारण्यांनी कधी मिरवण्यापलीकडे साहित्यात फारसा रस घेतला नाही. पण, साहित्यिक मात्र आज राजकारण खेळू लागले आहेत. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघू लागला असून ही साहित्यासाठी खेदाची बाब आहे. पुरस्कारवापसी हे याचे उदाहरण आहे. पण, ते परत करायचे असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बेंबीच्या देठापासून पाठपुरावा करणाऱ्या लेखकांनी मुळात आपले स्वातंत्र्य पुरस्काराच्या मोहात सरकारकडे गहाणच का टाकावे? असा सवाल करीत पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची गरज असूच शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आठलेकर बोलत होत्या. आठलेकर म्हणाल्या, परिषदेच्या पुरस्कारांचे विशेष हे की हा पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज करावा लागत नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने मिळणाऱ्या रकमेचा आकडा लाखाच्या घरात नसेल, पण संस्थेच्या पुरस्कार समितीने अनेक पुस्तकांतून निवडलेल्या पुस्तकाला दिला जाणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने लेखकाचा सन्मान करतो. याउलट लाख रकमेचे राज्य सरकारचे पुरस्कार दाराशी चालत येत नाहीत. ध्यानीमनी नसताना ते असे सहज मिळत नाहीत, तर मिळवावे लागतात आणि त्यासाठी लेखकाला अर्ज करावा लागतो.

नोकरीसाठी, आर्थिक मदतीसाठी, सरकारी कोटय़ातून घर मिळावे यासाठी अर्ज करावा लागणे समजू शकते. कारण इथे मुळात अर्ज करणाऱ्या व्यक्तीची भूमिकाच गरजू व्यक्तीची असते. पण आपण लिहिलेल्या पुस्तकाचा सन्मान व्हावा म्हणूनही साहित्यिकांनी अर्ज करायचा? पुरस्कार ही साहित्यिकाची गरज कधी बनली? उलट पुरस्कारासाठी असा अर्ज करण्याला साहित्यिकांचा आक्षेप कसा नाही, हा प्रश्न मला पडतो आणि त्याचबरोबर अर्ज करून मिळवलेले हे पुरस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आला की सरकारचा निषेध म्हणून परत करणारे साहित्यिक तर खूपच तात्त्विक गोंधळ घालतात, असेही मत आठलेकर यांनी व्यक्त केले.

आठलेकर यांच्या हस्ते कवी देवा िझजाड यांना कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, डॉ. संतोष जाधव यांना द. वा. पोतदार पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले यांना रा. श्री. जोग पुरस्कार, शेखर देशमुख यांना शं. ना. जोशी पुरस्कार, अंजली ढमाळ यांना सुहासिनी इर्लेकर पुरस्कार आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांना निर्मला मोने पुरस्कार प्रदान करण्यात आले. परिषदेचे प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार आणि बंडा जोशी या वेळी उपस्थित होते.

संमेलनाध्यक्षपद तरुण लेखकांना..

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा नेहमी वादाचा मुद्दा असतो. ज्येष्ठ साहित्यिकांविषयी माझ्या मनात पूर्ण आदर आहे. फक्त वयाने ज्येष्ठ नव्हे तर श्रेष्ठ कलानिर्मिती केलेल्या प्रत्येक साहित्यिकाचा जीवनगौरव देऊन सत्कार केला पाहिजे. पण, वय वाढलेल्या प्रत्येक साहित्यिकाला संमेलनाध्यक्षाचे पद बहाल केलेच पाहिजे हा आग्रह मला समजत नाही. उलट वयोवृद्ध साहित्यिकांनी आपण होऊन बाजूला व्हायला हवे. अशावेळी आपल्याला मिळू शकणारे अध्यक्षपद नाकारून मनस्वीपण लाभलेल्या तरुण लेखकांना ते त्यांनी आपण होऊन दिले पाहिजे, अशी भूमिका आठलेकर यांनी मांडली.

मंगला आठलेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Question by author mangala athalekar literary only let play politics akp

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या