आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून वाट करून देणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर मंगळवारी दुपारी पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून वाट करून देणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर मंगळवारी दुपारी पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यामध्ये गुंडाळलेले पार्थिव, पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी आणि शासकीय प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

लक्ष्मण यांना फुफ्फुस आणि किडनीविकाराचा त्रास होत होता. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे डायलिसिस करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवसांपासून लक्ष्मण यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. अखेर सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लक्ष्मण यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी कमला लक्ष्मण, पुत्र श्रीनिवास लक्ष्मण, स्नुषा उषा श्रीनिवास आणि नात असा परिवार आहे.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सिम्बायोसिस संस्थेच्या आवारातील ‘कॉमन मॅन’च्या पुतळय़ापाशी मंगळवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, विजय काळे, जगदीश मुळीक, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, ज्येष्ठ चित्रकार रवि परांजपे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ‘चिंटू’चे निर्माते चारुहास पंडित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, ‘कॉमन मॅन’चे शिल्पकार विवेक खटावकर, सरस्वती लायब्ररीचे कैलास भिंगारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
ठीक बाराच्या सुमारास तिरंगी ध्वजामध्ये लक्ष्मण यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर लक्ष्मण यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी येथे नेण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून लक्ष्मण यांना मानवंदना दिली. चाहत्यांच्या उपस्थितीत लक्ष्मण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रकलेचे स्मारक करणार

– मुख्यमंत्र्यांची घोषणा

सामान्य माणसांच्या व्यथा-वेदनांना चित्ररूप देणारे आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने कॉमन मॅन पोरका झाला असल्याची भावना व्यक्त करीत विविध मान्यवरांनी आर. के. लक्ष्मण यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
लक्ष्मण हे देशाचे वैभव होते. त्यांच्या निधानाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. लक्ष्मण शरीराने आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा कॉमन मॅन हा जगाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. हा कॉमन मॅन शासकीय, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर अंकुश ठेवेल. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रकलेचे उचित स्मारक साकारण्यात येईल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे :
लक्ष्मण म्हणजे कुंचल्याचा अखेरचा सम्राट. बाळासाहेब ठाकरे आणि लक्ष्मण या दोघांचीही कारकीर्द एकाच वेळी आणि एकाच वृत्तपत्रातून सुरू झाली. दोघांमध्ये अनोखा स्नेहबंध होता. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब खास लक्ष्मण यांना भेटण्यासाठी पुण्याला आले होते. बाळासाहेबांनंतर आता लक्ष्मण यांच्या निधनाने कुंचल्याचा अखेरचा सम्राट आपल्यातून गेला.

‘‘माझी आणि लक्ष्मण यांची प्रत्यक्षात ओळख नव्हती. मी काम सुरू केले तेव्हा त्यांनी काम करणे थांबविले होते. प्रत्यक्षात कधी भेटलो नसलो तरी चित्रांच्या माध्यमातून माझा त्यांच्याशी परिचय होता. त्यानंतर ‘चिंटू’ मुळे त्यांची भेट झाली. ‘मालगुडी डेज’साठी त्यांनी उत्तम रेखाटने केली होती. राजकीय घडामोडींवरचा उत्तम भाष्यकार अशीच लक्ष्मण यांची ओळख होती.’’

– चारुहास पंडित, व्यंगचित्रकार

ज्येष्ठ कलाकारांची श्रद्धांजली :

‘‘भावस्पर्शी आणि राजकीय मर्मग्राही रेषा वश असलेले आर. के. लक्ष्मण यांच्यासारखे चित्रकार दुर्मिळ असतात. एक थोर माणूस आपल्यातून गेला आणि चित्रकलेचे क्षेत्र पोरके झाले. देशाचं भलं व्हावं हीच इच्छा बाळगून त्यांनी व्यंगचित्रे रेखाटली.’’
– रवी परांजपे, ज्येष्ठ चित्रकार
.
‘‘सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्र कलेतून वाट करून देण्याचे काम आर. के. लक्ष्मण यांनी हयातभर केले. त्यांच्या चित्राबद्दल कधी वादविवाद झाले नाहीत. किंबहुना चित्रांतून ते ज्याच्यावर टीका करायचे त्यालाही ते चित्र आवडायचे. त्यांच्या चित्रांना साहित्याचा रंग होता. माणसाचा स्वभाव रेषेमध्ये चितारण्याचे कसब त्यांच्याकडे होते. कॉमन मॅनच्या माध्यमातून लक्ष्मण अमर झाले आहेत.’’
– मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: R k laxman funeral governmental honours

ताज्या बातम्या