पुणे : ‘मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे मनोज जरांगे यांनी या सणात व्यत्यय येणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि गणेशोत्सव झाल्यानंतर मुंबईत यावे,’ असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी उपाेषण सुरू केले आहे. त्याबाबत विखे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘सातारा आणि कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करण्यात काही अडचणी आहेत. त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. कायदेशीर बाबी स्पष्ट झाल्यानंतर त्याची अंमलबाजावणी केली जाईल.’
‘जरांगे जी विधाने करत आहेत, जे शब्द वापरत आहेत, ते अयोग्य आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी ते संघर्ष करत आहेत. त्यांनी माझ्याबाबतही काही विधान केले. मात्र, समाजासाठी मी त्याकडे दुर्लक्ष केले. संवाद आणि चर्चेतून प्रश्न सुटतात. गणेशोत्सवामुळे ते आंदोलन मागे घेतील, ही अपेक्षा आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात अनेक मराठा अभ्यासकांबरोबर चर्चा होत आहे. चर्चेसाठी दरवाजे बंद नाहीत. मात्र, गणेशोत्सवात काही विपरीत होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे,’ असे विखे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत वाटेल तसे बोलणे योग्य नाही,’ अशी टिप्पणी आपत्ती निवारणमंत्री गिरीश महाजन यांनीही केली. ‘सरकार पाडून टाकीन, मुख्यमंत्र्यांना घरी बसवेन, अशी भाषा अयोग्य आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेतून सुटावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जरांगे यांनीही दोन पावले मागे यावे,’ असे ते म्हणाले.
रोहित पवारांवर टीका
‘आमदार रोहित पवार यांना प्रसिद्धी मिळविण्याची हाव लागली आहे. प्रत्येक गोष्टीत बोलण्याची किंवा टीका-टिप्पणी करण्याची त्यांना सवय लागली आहे. त्यातूनच ते काहीही बोलत असतात,’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. ‘नाशिक येथील यंदाचा कुंभमेळा आगळावेगळा आहे. या कुंभमेळ्यासाठी १० ते १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. कुंभमेळ्यामुळे नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. मात्र, कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा दावा महाजन यांनी केला.
