scorecardresearch

‘‘सनातन’ला केंद्र व राज्य सरकारचा राजाश्रय’ – राधाकृष्ण विखे पाटील

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली.

राधाकृष्ण विखे पाटील,radhakrishna vikhe
राधाकृष्ण विखे पाटील (संग्रहित छायाचित्र)

‘ ‘सनातन संस्थे’कडून राजकीय दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र व राज्य सरकारचा राजाश्रय मिळाल्यामुळेच या संघटनेकडून जाहीरपणे धमक्या दिल्या जात आहेत,’ असे मत व्यक्त करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली. पानसरे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच व्हावी. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत एसआयटीच्या अधिकाऱ्याची व कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पोलिस प्रमुखाची बदली करु नये, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
सनातन संघटनेकडून ‘सनातन प्रभात’ या मुखपत्रातून उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, तसेच पोलिस व पत्रकारांनाही धमक्या येत आहेत, असे सांगून राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले,‘ सरकारवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असूनही काही मंडळी याचे समर्थन करत आहेत. प्रथम त्या संपादकास अटक व्हायला हवी व संस्थेवर बंदी घालतानाच संस्थेच्या प्रमुखावर कारवाई व्हायला हवी. मुख्यमंत्री याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत हे आश्चर्याचे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले नव्हते. पानसरे हत्या प्रकरणाची चौकशीही धिम्या गतीने चालली होती. एखाद्या यंत्रणेत किती राजकीय हस्तक्षेप असावा याचे हे उत्तम उदाहरण असून सरकारला या दोन्ही हत्यांच्या तपासात अपयश आले आहे. कर्नाटक सरकार ज्या गतीने कारवाई करत आहे त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार सुस्तावलेले आहे.’
‘प्रतिगामी शक्तींना व राजकीय दहशतवादाला विरोध करणाऱ्या सर्वाना एकत्र करुन दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्याच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेऊ,’ असेही त्यांनी सांगितले.

‘जलयुक्त शिवाराचे फोटो काढून
पाठ थोपटून घेणे सुरू’
राज्या शासनाबद्दल विखे- पाटील म्हणाले,‘दुष्काळ निवारणासाठी सरकारचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. खरीप गेले, दुबार पेरणी संपली, रब्बीच्या पेरण्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत, पण मुख्यमंत्री व महसूलमंत्री आताच उत्तम पीक येणार असल्याचे सांगतात. कोणते पीक येणार ते काही कळत नाही. आता पडलेल्या पावसाचा संदर्भ राज्यातील किती भागाशी आहे हे लक्षात न घेता केवळ जलयुक्त शिवाराची छायाचित्रे काढून महाराष्ट्र दुष्काळमुक्त केल्याचे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सरकार नावाची व्यवस्थाच अस्तित्वात नसून सारे काही लोकप्रतिनिधींच्या सहभागाविना अधिकाऱ्यांच्या व रामाच्या भरवशावर सुरू आहे.’
‘शिवसेनेकडे विषय राहिलेला नाही!’
शिवसेनेवर टीका करताना राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले,‘शिवसेना केवळ ‘सामना’तूनच बोलत असून त्यांना दुसरे काम उरलेले नाही. सत्तेत जाण्यापूर्वी त्यांनी दुष्काळासाठी ५४ हजार कोटींचे पॅकेज मागितले होते, सत्तेत गेल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2015 at 03:23 IST

संबंधित बातम्या