पुणे : मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती काम करत नसून, समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावे, यासाठी नेमलेल्या संस्था-संघटना, अभ्यासक आणि समाजबांधवांशी समितीने एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, किरण गायकर, किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. विखे यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या शिर्डी मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची बैठक घेऊन प्रश्न विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावे, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, या समितीने संस्था-संघटना, अभ्यासक आणि समाजबांधवांशी एकही बैठक घेतली नाही. विखे-पाटील आणि त्यांची समिती काहीही काम करत नाहीत, असे आरोपही करण्यात आले.

कोंढरे म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये अनेक मंत्री आहेत. काही खात्यांचे सचिव आणि अधिकारी आहेत. मात्र, या समितीची आढावा बैठक अर्धा तासही होत नाही. अधिकारी काहीतरी सादरीकरण करतात. त्याच आधारे निर्णय होतात. या निर्णयांचे पुढे काहीही होत नाही. या समितीने मराठा आरक्षणावर ८० टक्के काम आणि इतर योजनांवर २० टक्के काम केले पाहिजे. त्याऐवजी कुणबी प्रमाणपत्र एवढाच विषय समितीने हाती घेतला आहे. त्यातही त्यांना शंभर टक्के यश मिळाले नाही.’

‘आरक्षणाच्या पर्यायांबाबत मराठा समाजामध्ये संभ्रम आहे. कुणबी जात प्रमाणपत्र काढून लाभ मिळेलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे कोणत्या पर्यायातून कायदेशीररीत्या लाभ मिळू शकतो, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी. मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि एसईबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचा एकत्रित आढावा घेऊन श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी,’ अशी मागणीही कोंढरे यांनी केली.

गायकर म्हणाले, ‘मराठा समाजातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विखे यांच्याकडे वेळ नाही. सातत्याने मागणी करूनही समाजबांधव, मराठा आरक्षण प्रश्नावरील अभ्यासक-संस्था-संघटनांची बैठक घेण्यास विखे यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. आरक्षणाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांना समाजाचे प्रश्न सोडविता येत नसतील, तर त्यांनी पदावरून बाजूला व्हावे.’

‘विखे यांनी निविदांच्या माध्यमातून समाजात गटतट निर्माण करण्याचे पाप केले. त्यामुळे समाजातील मूळ प्रश्न मागे पडले असून, त्याची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा. मराठा आरक्षणाबरोबरच सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्या आणि समाजातील इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,’ असा आरोप गायकर यांनी केला.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा तसेच विविध संस्था आणि संघटनांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात झाली. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सोडविण्यात आलेले प्रश्न, मराठा समाजासाठीच्या सरकारी योजनांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांचे प्रश्न सोडवावेत, समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावेत, अशा मागण्याही ठरावाद्वारे करण्यात आल्या.