पुणे : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारित केलेली ऑडिओ क्लिप जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच जरांगे यांना दिल्याच्या आरोपावर ‘या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ‘एसआयटी’ चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी दिले.

‘देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यामुळे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण कधीही केलेले नाही,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘भाजप पदाधिकाऱ्यांच्या दूरध्वनीवरील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप मनोज जरांगे यांच्याशी संबंधित वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. ही क्लिप जरांगे यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचा आरोप संगिता वानखेडे यांनी केला होता. त्या संदर्भात विचारणा केली असता ते बोलत होते. ‘कोण काय आरोप करतो, याला मी अधिक महत्त्व देत नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ‘एसआयटी’ चौकशीची घोषणा केली असून, चौकशीसाठी अधिकारीही नेमले आहेत. या चौकशीत सर्व बाबी पुढे येतील,’ असे विखे यांनी सांगितले.

फडणवीस यांच्याविरोधात पत्रकार परिषदे घेण्याचेही विखे यांनीच सांगितले होते, असा दावाही वानखेडे यांनी केला होता. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. या पद्धतीचे घाणेरडे राजकारण मी कधीही केलेले नाही. कोणाला आरोप करायचे असतील तर त्यांनी ते करावेत; त्यांच्या आरोपांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.