पुणे : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत धातूचा कृत्रिम सांधा वापरला जातो. धातूच्या सांध्यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांवर उपाय म्हणून धातूऐवजी सिरॅमिकचा सांधा वापरण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील रुग्णालयात यशस्वी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी रुग्णालयात रोबोटिकच्या सहाय्याने करण्यात आलेल्या गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिकचा सांधा वापरण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केली. याबद्दल बोलताना डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की, गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम सांध्यामध्ये धातूऐवजी आता सिरॅमिक वापरण्यात आले आहे. सिरॅमिक रुग्णाच्या आंतरप्रकृतीतील उतीशी साधर्म्य असणारे असल्यामुळे शरीराशी सहज जुळवून घेण्यास मदत करणारे आहे. त्यामुळे ॲलर्जी असणाऱ्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो आणि संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो. सिरॅमिक सांध्यामुळे अचूकतेमध्ये कोणताही फरक पडत नाही. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या हालचालीत सुधारणा, सहजता येऊ शकते.

हेही वाचा – ‘#वेकअप पुणेकर’! तुमच्या नागरी समस्यांवर आता तुम्हीच सुचवा उपाय

गुडघेदुखी ही तरुण वयातसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यांच्यामध्येही संधिवाताचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी वय कमी आहे म्हणून रुग्ण शस्त्रक्रिया टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. तरुण वयात शस्त्रक्रिया केल्यास पुन्हा काही वर्षांनी सांधेरोपण शस्त्रक्रिया करावी लागेल म्हणून ते दुखणे सहन करत राहतात. त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनातील हालचालीवर परिणाम होतो. या दृष्टीने सांध्याचे आयुर्मान वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू असतात. त्यादृष्टीने या सिरॅमिक सांध्याचा फायदा होणार आहे, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

हेही वाचा – दुर्मीळ पॅराथायरॉईड कर्करोगावर उपचार; निदान अन् शस्त्रक्रियेविषयी जाणून घ्या…

तरुण रुग्णांना अधिक फायदा

नी सोसायटी स्कोरच्या अभ्यासानुसार सिरॅमिक सांध्यामुळे रुग्णास कमी वेदना होऊन त्याच्या दैनंदिन कामात सुलभता येते असे दिसून आले आहे. या सांध्याचे आयुर्मानही इतर सांध्यांच्या तुलनेत अधिक आहे. खुब्याच्या शस्त्रक्रियेबरोबरच गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतही सिरॅमिक सांध्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने मुख्यतः तरुण वयातील रुग्णांना याचा अधिक फायदा होऊ शकतो, असे डॉ. वैद्य यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radical changes in knee transplant surgery use of ceramic joint instead of metal would be beneficial pune print news stj 05 ssb
First published on: 05-02-2024 at 10:48 IST