शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले होते. तरुणीच्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आला होता. या प्रकरणी रघुनाथ कुचिक यांना जामीन मिळाला. पण रघुनाथ कुचिक यांनी अटी आणि शर्तीचा भंग केला आहे,असा आरोप भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्यामुळे कुचिक यांचा जामीन रद्द केला जावा अशी मागणी पुणे पोलिसांकडे केली होती. त्याबाबत अखेर सोमवारी चित्रा वाघ यांचा शिवाजीनगर पोलिसांनी जबाब घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, माझ्याकडील सर्व पुरावे मी पोलिसांना दिले आहेत. मला विश्वास आहे की,येणार्‍या दिवसांमध्ये १०० टक्के कुचिक यांचा जामीन रद्द होईल.

“१२ एप्रिल रोजी माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. यानंतर पीडितेने केलेला खुलासा मी पोलिसांकडे दिला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मी मागणी केली होती की, ज्या अटी शर्तींवर रघुनाथ कुचिक यांना जामीन मिळाला आहे तो रद्द व्हावा. त्यांनी अटी शर्तींचा भंग केला आहे. पोलिसांनी त्याची चौकशी करुन जामीन रद्द होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्या अर्जावरील सविस्तर जबाब शिवाजीनगर पोलिसांनी घेतला आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. माझ्याकडे जे पुरावे होते ते मी पोलिसांना दिले आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द होईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक यांच्यावर गुन्हा दाखल असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप त्यांचा राज्यमंत्री पदाचा दर्जा काढलेला नाही. आज ही ते समाजात उजळ माथ्याने फिरत आहे. त्यामुळे असल्या समाज कंटकांची जागा जेल मध्येच आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

या प्रकरणात चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. याबाबतही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्या पीडित तरुणीसोबत सुरवातीपासून होते. मी तिला कायदेशीर मदत केली आहे. तिने कोणाच्या दबावाखाली माझ्यावर आरोप केले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच बरोबर राज्यातील महिला किंवा तरुणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी मी सर्वांच्या सदैव सोबत आहे. मी आज देखील, त्या तरुणीच्या सोबत आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.