scorecardresearch

रघुनाथ कुचिक प्रकरणास लागणार वेगळं वळण?; पीडितेचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटीसाठी फोन!

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच”

(संग्रहीत छायाचित्र)

बलात्काराच्या आरोपामुळे सर्वत्र राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणातील पीडितेने आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्वत: फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय, आपणास काही माहिती द्यायची असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणास वेगळे वळण लागणार असल्याचे दिसत आहे.

या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणर यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. “शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच. रघुनाथ कुचिक प्रकरणात संबंधित पीडितीने काही दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत माझी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जावी, असं तिने म्हटलं होतं. त्यानुसार पोलिसांना निर्देश देऊन आपण तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी देखील केली. ज्यावेळेस संबंधित पीडितीने मदत मागितली त्यावेळी संपूर्ण मदत आणि सहकार्य पीडितेस केलेलं आहे. परंतु, यामध्ये काही व्यक्ती दिवसरात्रं महिला सुरक्षेच्यादृष्टीने दिवसरात्रं टाहो फोडतात, परंतु स्वत:च्या राजकीय हव्यासा पोटी एका युवतीचं आयुष्य त्यांनी उध्वस्त केलेलं आहे. त्यामुळे मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत. आज पीडितीनेच खळबळजनक वक्तव्य करून यांचा खुलासा केलेला आहे.” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

तसेच, “राज्य महिला आयोगाच्यावतीने संबंधित पीडितेस निश्चितपणे न्याय दिला जात असताना, काही वेळापूर्वीच तिचा मला फोन आला आणि तिने प्रत्यक्ष भेटून काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. निश्चितच मी देखील तिची भेट घेणारच आहे. परंतु यामध्ये काही धागेदोरे आहेत, नक्की काय प्रकरण आहे याची संपूर्ण माहिती घेऊन संबधित व्यक्ती कोणी या पद्धतीने जर एखाद्या व्यक्तील बदनाम करत असेल, एखाद्या युवतीचा आयुष्य उध्वस्त करत असेल तर त्यावर निश्चतपणे कडक कारवाई करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाकडून दिल्या जातील.” असंही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणर यांनी बोलून दाखवलं आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raghunath kuchik case will take a different turn the victims phone call to the chairperson of the state womens commission msr 87 svk

ताज्या बातम्या