पुणे : ‘तमाशा, लावणी, शाहिरी, लोकनाट्य आणि वगनाट्य यांसारख्या पारंपरिक लोककलांवर डीजे संस्कृतीचे आक्रमण वाढले आहे. लोककला टिकवण्यासाठी डीजे संस्कृती रोखण्याबरोबरच समाजाने संघटितपणे आवाज उठविण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी बुधवारी व्यक्त केली. प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असलेल्या तमाशासह लोककला जिवंत ठेवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रुग्ण हक्क परिषद व कलाप्रेमी नागरिकांच्या वतीने रघुवीर खेडकर यांचा ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी खेडकर बोलत होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर निवडून आल्याबद्दल झाल्याबद्दल मेघराज राजेभोसले यांचा सन्मान करण्यात आला. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पार्श्वगायक प्रा. गणेश चंदनशिवे, माजी सहायक पोलीस आयुक्त जानमहंमद पठाण, परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, शहराध्यक्षा अपर्णा साठे-मारणे या वेळी उपस्थित होत्या.

खेडकर म्हणाले, ‘काहीजण आजही लोककलेकडे दुय्यम नजरेने पाहतात. अशा वेळी लोककलावंताच्या वाट्याला सन्मान येणे ही दुर्मीळ बाब आहे. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे लोककलेचा सन्मान आहे. माझ्या जन्माच्या अवघ्या पाचव्या दिवशी तमाशाच्या फडावर माझे पदार्पण झाले. आईने अपार कष्ट घेऊन मला घडवले. काळानुरूप बदल आवश्यक असले, तरी डीजे लावणीने या लोककलेवर मोठा आघात केला आहे. एकेकाळी तमाशा लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते. मात्र, आता वगनाट्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या कलाकारांनी लावणीला जागतिक स्तरावर नेले; पण डीजे संस्कृतीमुळे या कलेच्या पुनरुज्जीवनाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातून लोककलेच्या संवर्धनासाठी आवाज उठला, तर तो दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो.’

पाटील म्हणाले, ‘खेडकर यांच्या आई कांताबाई सातारकर यांना अर्थसहाय्य करण्याची संधी मिळाली आणि त्यातून त्यांचा तमाशा फड उभा राहिला. प्रतिकूल परिस्थितीतही या कुटुंबाने तमाशा, लावणी आणि गवळण यांसारख्या लोककलांचे जतन आणि संवर्धन केले. लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असून, अशा कलाकारांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणे ही समाजाची जबाबदारी आहे.’

पवार म्हणाले, ‘लोककला ही ग्रामीण समाजजीवनाचा आत्मा आहे. रघुवीर खेडकर यांनी केवळ तमाशा सादर केला नाही, तर लोककलेचा सन्मान आणि अस्मिता जपण्याचे मोठे कार्य केले आहे. नव्या पिढीने या कलेचा वारसा जपण्यासाठी पुढे यावे, ही काळाची गरज आहे.’

उमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जीवराज चोले यांनी आभार मानले.

लावणीचा दर्जा घसरला आहे. रसिक नको त्या गोष्टींना डोक्यावर घेत आहेत. मात्र, काही काळापुरती रसिकांना आकर्षित करणारी ही गोष्ट आहे. कालांतराने लोक पुन्हा लावणी आणि लोककलेला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. – सुरेखा पुणेकर, लावणीसम्राज्ञी