पुणे : जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुढील आठवड्यात २२ ऑगस्ट रोजी गांधी पुण्यात येणार असून ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी तरुणाईशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाबद्दल तरुणांच्या मनात असलेला रोष वाढत असल्याचे चित्र आहे. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी होत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गांधी यांनी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता.
नीट पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणानंतर देखील केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने राहुल गांधी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले भूमिका घेतल्या. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देखील द्यावा लागला. दिल्ली सह संपूर्ण देशभरातील विविध भागात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू लावून धरली होती.
विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर फोडले, लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवून तरुणाईच्या पाठीमागे राहुल गांधी भक्कमपणे उभे राहिले. या आंदोलनाच्या यशानंतर वेगवेगळ्या भागात जाऊन राहुल गांधी तरुणाईची संवाद साधत त्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात राहुल गांधी यांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘पुढील आठवड्यात राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यात प्रथमच विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. विविध देशांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे येतात. त्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.
‘नीट’ पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा मुख्य केंद्रबिंदू पुण्यात होता. राहुल गांधी या दौऱ्यात विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतील. देशातील विविध शहरांमध्ये राहुल गांधी यांनी ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बाबत आपले विचार मांडले आहेत.’
