scorecardresearch

पुणे : बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरात जुगार अड्ड्यांवर छापा, गुन्हे शाखेकडून १८ जणांविरुद्ध गुन्हा

मार्केट यार्ड परिसरात पत्यांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले.

pune crime branch raid gambling filed
संग्रहित छायाचित्र

पुणे : बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून १८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

मार्केट यार्ड परिसरात पत्यांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी रोकड आणि जुगाराचे साहित्य असा ४१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकूण ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बिबवेवाडी भागात मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने कारावाई करुन सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा दहा हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या