पुणे : गेल्या नऊ वर्षांत रायगड विकास प्राधिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधांची दुरवस्था झाल्याचा आरोप रायगड बचाव समितीकडून मंगळवारी करण्यात आला.

‘रायगडावरील टकमक टोकाजवळच्या सुरक्षा जाळ्या गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत आहेत. गडावरील चुन्याचा घाणा, शिवकालीन दारूची जाळी आदी ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच, विकासकामांविषयी प्राधिकरणाकडून करण्यात येणारे दावे आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असून, रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करावे,’ अशी मागणी समितीच्या वतीने शिवरायांच्या सैन्यातील सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि ॲड. अर्चना मारणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘तीन वर्षांपासून बंद असलेली गडावरील स्वच्छतागृहे आता मोडकळीला आली आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्याने पैसे खर्च करण्यात येणार आहेत. १५ लाख रुपये खर्चून बसविलेले पाण्याचे फिल्टर एका महिन्यात बंद पडले. गडावरील पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. टकमक टोकावरील सुरक्षा कठडे, लोखंडी जाळ्या तुटलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत. चुन्याचा घाणा, शिवकालीन दारूची जाळी यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे गंभीर नुकसान झाले आहे. नव्याने बांधलेल्या पायऱ्यांमागील संरक्षक भिंत खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे,’ असे मारणे यांनी सांगितले.

‘किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. गेल्या नऊ वर्षांत रायगडाच्या संवर्धनासाठी ६०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, गडावर अपेक्षित विकासकामे होत नाहीत. विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. या प्रकाराला जबाबदार असलेले रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करण्याची गरज आहे,’ असे गोळे यांनी नमूद केले.

दरम्यान, या संदर्भात रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.

रायगड बचाव समितीच्या मागण्या

  • रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करण्यात यावे.
  • सध्या सुरू असलेली निकृष्ट कामे थांबवून १५ दिवसांच्या आत नवीन समिती स्थापन करण्यात यावी.
  • निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे.
  • रायगडावरील कामांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी.
  • गडावर महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ स्वच्छतागृहे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत.
  • धोकादायक ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था तातडीने दुरुस्त करण्यात यावी.
  • रायगडावरील वणवे रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात याव्यात.
  • गडावरील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात यावी.
  • रायगड घेऱ्यातील २१ गावांमधील ऐतिहासिक वारशांचे संवर्धन करण्यात यावे.

रायगडावर जाणारे गिर्यारोहक काय सांगतात?

सध्या गडावर अनेक कामे सुरू असलेली दिसतात. स्वच्छतागृहाचेही काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, काही ठिकाणच्या पायाभूत सुविधा दुर्लक्षित असलेल्या दिसतात. टकमक टोकाजवळचे सुरक्षा कठडे आणि जाळ्यांची दुरवस्था झाली आहे. शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पायाभूत सुविधा असणे अत्यंत गरजेचे असल्याचे निरिक्षण रायगडावर जाणाऱ्या गिर्यारोहकांनी नोंदवले. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. इतर कोणत्याही गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत नाहीत. त्यामुळे गडावरील पायाभूत सुविधांचा विस्तार होणे गरजेचे आहे. मात्र, काही गटांमधील वाद, पुरातत्व विभागाचे नियम आणि गडावर सामानांची ने-आण करताना येणाऱ्या अडचणींमुळे बरीच कामे खोळंबलेली दिसतात. येत्या शिवराज्यभिषेक दिनापर्यंत काही प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये सुधार करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘स्वच्छतेची जबाबदारी प्राधिकरणाची नाही’

‘रायगडावर शासनाच्या १० ते १२ वेगवेगळ्या विभागांकडून वेगवेगळी कामे करण्यात येत आहेत. किल्ल्यावरील स्वच्छता-पायाभूत सुविधांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. गडाचा मुख्य भाग संपूर्णपणे पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात आहे. त्यामुळे तेथील संपूर्ण व्यवस्था पुरातत्त्व विभागाकडून राबवली जाते. तर रायगड प्राधिकरणाला जतन आणि संवर्धनासाठी निधी देण्यात आला. पण, पुरातत्त्व विभागाच्या मागणीवरून प्राधिकरणाने गडावर स्वच्छतागृहे बांधली. मात्र, त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची तरतूद नव्हती. गडावर असलेले पाण्याचे फिल्टर संभाजीराजे छत्रपतींना भेट देण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून कोणताही निधी देण्यात आला नाही. त्याच्या देखभाल खर्चाची तरतूदही सरकारकडून करण्यात आली नाही. मात्र, राज्याभिषेक सोहळ्याच्या कालावधीत राज्याभिषेक समितीच्या माध्यमातून या पाण्याच्या फिल्टरची दुरुस्ती करण्यात येते,’ अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे तज्ज्ञ सल्लागार मालोजीराव जगदाळे यांनी दिली.

‘प्राधिकरणाला मंजूर झालेल्या निधीपैकी १०० कोटी रुपये गडावरील संवर्धनाच्या कामासाठी वापरण्यात येत असून, उर्वरित निधीतून रायगडच्या २१ गावांमधील संवर्धनासाठी वापरण्यात येत आहे. परिसरात अनेक रस्ते बांधण्यात आले. तसेच, गडावरही आता नव्याने ६२ स्वच्छतागृहे उभारण्यात येत असून, आणखी १०० स्वच्छतागृहांसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. गडावरील देखभाल-दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी प्राधिकरणाकडे आल्यास स्वच्छता, पाणी आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येतील,’ असेही जगदाळे यांनी नमूद केले.