पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. लोहमार्गावर आत्महत्या करणाऱ्यांच्याही संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत असून, लोहमार्गालगत वस्त्या असणाऱ्या भागामध्ये सर्वाधिक अपघात होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. अपघात व आत्महत्यांची संख्या वाढत असताना रेल्वे प्रशासनाची डोकेदुखीही वाढली आहे.
लोहमार्गावर आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचा व मुलाचाही रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी फुगेवाडी भागामध्ये घडली. या प्रकारामुळे लोहमार्गावरील अपघात व आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे व धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रकारातून पुणे विभागात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका वर्षांत सुमारे साडेतीनशेहून अधिक मृत्यू या प्रकारांमुळे होत आहेत. लोहमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रकारही वाढले आहेत. रेल्वेच्या धडकेने मृत्यू पावणाऱ्यांमध्ये सुमारे ४० टक्के आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे विभागामध्ये दर महिन्याला सुमारे २० ते ३० नागरिक रेल्वेखाली आत्महत्या करीत असल्याचे दिसून येते. पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावर सर्वाधिक आत्महत्या व अपघात होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दापोडी, फुगेवाडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड आदी स्थानकांच्या लगत मोठय़ा प्रमाणावर आत्महत्या होत असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होत आहे. मावळमध्ये वडगाव व कामशेत या परिसरातही रेल्वेखाली आत्महत्येच्या घटना सातत्याने घडतात. लोहमार्गावर होणाऱ्या एकूण मृत्यूमध्ये २०१२-२०१३ या आर्थिक वर्षांमध्ये ३८० मृत्यू झाले. २०१३-१४  व १५ या वर्षांमध्ये हा आकडा चारशेच्याही पुढे गेला. २००९-१० या वर्षांतील मृत्यूची संख्या लक्षात घेतली, तर पाचच वर्षांमध्ये लोहमार्गावरील मृत्यू दुपटीने वाढले असल्याचे स्पष्ट होते आहे.
लोहमार्गावर आत्महत्या वाढत असताना रेल्वेच्या दृष्टीनेही ही डोकेदुखी ठरत आहे. एकूणच लोहमार्गावरील मृत्यू टाळण्याच्या दृष्टीने गाडय़ांच्या चालकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात स्थानकालगतच्या भागात त्याचप्रमाणे लोहमार्गालगत लोकवस्ती असलेल्या भागातही गाडीचा हॉर्न वाजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोहमार्गालगत वाढत असलेल्या लोकवस्त्या हे लोहमार्गावरील मृत्यूमध्ये वाढ होण्याचे एक प्रमुख कारण आहे. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला वस्ती असल्यास एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी लोहमार्ग ओलांडला जातो. काही ठिकाणी शॉटकर्ट म्हणून लोहमार्गाचा वापर पायवाटेप्रमाणे केला जातो. याच प्रकारातून लोहमार्गावरील मृत्यू वाढत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.