पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करीत असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाला गुरुवारी रात्री चोरटय़ांनी चाकूहल्ला करून लुटले. तीन आठवडय़ांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानावर गुंडाने चाकूने वार केले होते.. या प्रातिनिधिक घटना पाहता रेल्वेच्या प्रवासात किंवा स्थानकात रेल्वेचे अधिकारी व पोलीसही सुरक्षित नसल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे काय, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे रेल्वे स्थानकाबरोबरच पुणे-लोणावळा लोकल व विभागात धावणाऱ्या गाडय़ा आता गुन्हेगारांचे अड्डे होत आहेत.
लोणावळा स्थानकाचे व्यवस्थापक नारायण शेळके हे रात्रीच्या लोकलने तळेगाव येथे घरी जात असताना प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये चोरटय़ांनी त्यांना लुटले व त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. मे महिन्यामध्ये रेल्वे स्थानकावर गाडीत जागा मिळवून देणाऱ्या एका गुंडाने रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांना मारहाण केली होती. त्यातील एकावर चाकूने वारही केले. या घटना पाहता सामान्य प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करावा की नाही किंवा स्थानकावर जावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेचे अधिकारी व पोलीसही असुरक्षित असतील, तर इतरांबाबत काय परिस्थिती असेल, याचा अंदाज येतो.
पुणे-लोणावळा लोकल किंवा विभागात रात्री धावणाऱ्या गाडय़ांमध्ये त्याचप्रमाणे स्थानकामध्ये सातत्याने मारामारीच्या किंवा प्रवाशांच्या लुटमारीच्या घटना घडतात. मुळात गाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षेची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. पुणे-लोणावळा लोकलमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घातली जात होती. मात्र, काही वर्षांपासून ती बंद करण्यात आली. त्यामुळे लोणावळा लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा अक्षरश: रामभरोसे आहे. त्याचाच फटका लोणावळा स्थानकाच्या व्यवस्थापकांनाही बसला. प्रवाशांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना रेल्वेची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, त्या यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, असे सांगितले जाते. मनुष्यबळ तर वाढलेच पाहिजे, पण आहे त्या मनुष्यबळाचाही योग्य वापर करून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुणे रेल्वे स्थानक गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. प्रवाशांची लूटमार करण्याचे अनेक प्रकार सातत्याने होत असतात. एकीकडे जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन करायचे म्हटले जाते. पण, वास्तवात प्रवाशांना कोणतीही सुरक्षा नाही. तक्रारींची दखल घेतली जात नाही. सुधारणा व सुविधा तर नाहीच, त्याबरोबर संरक्षणही नसल्याने प्रवाशांनी जायचे कुठे?
– हर्षां शहा
अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप
————-
रेल्वे अधिकाऱ्यांवर हल्ला होत असेल, तर सामान्य प्रवाशांचे काय होणार. रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी आहे, ही सबब चालणार नाही. तातडीने हे संख्याबळ वाढले पाहिजे.
– हेमंत टपाले
सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती