मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून वर्षांला तब्बल आठशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असतानाही या विभागातील प्रवाशांना पुरेशा सुविधाच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही सक्षम यंत्रणा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे सुरक्षा दलातील अनेक जागा रिक्त आहेत. रेल्वेच्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना सुरक्षा यंत्रणा मात्र पूर्वीप्रमाणेच तुटपुंजी असल्याने मोठी कमाई होऊनही सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेकडून होणारी ढिलाई स्पष्ट होते आहे.
मुंबईत दहशतवाद्यांकडून रेल्वेच्या डब्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्याचप्रमाणे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही रेल्वेस्थानकात नागरिकांवर हल्ला करण्यात आला. या सर्व पाश्र्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या होत्या. रेल्वेगाडय़ांमध्ये तसेच स्थानकावर असणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासह रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षाही गरजेची आहे. पुणे विभागामध्ये पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, बारामती आदी महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानकावर मेटल डिटेक्टर व सीसीटीव्ही आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, रेल्वे सुरक्षा दलातील मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्यक्षात करण्यात येणाऱ्या सुरक्षिततेच्या योजनांना मर्यादा येत असल्याचे दिसते आहे.
पुणे विभागामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे सध्या चारशे कर्मचारी आहेत. पुणे विभागाचा विस्तार व स्थानकांची संख्या लक्षात घेता आणखी सुमारे दोनशेचे मनुष्यबळ अपेक्षित आहे. अनेक दिवसांपासून या जागा रिक्त आहेत. पुण्यासह काही महत्त्वाच्या स्थानकावर रेल्वेच्या मालमत्तेची व इतर सुरक्षा करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येतात. पुणे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांमध्ये व गाडय़ांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे स्थानकावरून दररोज दीड लाख प्रवासी ये-जा करतात. सुमारे दीडशे गाडय़ा स्थानकात येतात. मात्र त्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे स्थानकाच्या आवारात व गाडय़ांमध्येही अनेक गुन्हे सातत्याने घडतात.
दहशतवादी दूरच, चोरटय़ांनाही आवरणे कठीण
दहशतवादी कृत्यांपासून बचाव करणे तर दूरच, पण स्थानिक गुन्हेगारांपासून प्रवाशांना वाचविण्याची क्षमता सध्याच्या सुरक्षा यंत्रणेत आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यातूनच चोरटय़ांकडून प्रवाशांना गाडय़ांमध्ये व स्थानकात लूटमारीच्या व हाणामारीच्या अनेक घटना घडत असतात. मागील आठवडय़ात याचा फटका रेल्वेच्या अधिकाऱ्यालाही बसला. लोणावळा स्थानकाच्या व्यवस्थापकाला लोकलच्या प्रवासात लुटण्यात आले व चाकूने हल्लाही करण्यात आला. प्रवासी व गाडय़ा वाढत असताना त्या तुलनेत सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, ही सध्याची मोठी अडचण आहे. पुणे विभागातून प्रचंड उत्पन्न मिळत असताना व त्यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही या विभागातील सुरक्षेकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.