जाहिरातींचे चित्र-विचित्र फलक, उडालेला रंग, जळमाटे, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या.. अशा अनेक कारणांनी विद्रुप  झालेल्या रेल्वे स्थानकातील भिंतींचा चेहरा आता रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छताविषयक धोरणांमुळे हळूहळू बदलू लागला असतानाच या भिंतींवर आता पुणे शहराची आधुनिक व सांस्कृतिक ओळख  चितारण्यात येणार आहे. ‘एमआयटी स्कूल ऑफ डिझायनिंग’च्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, पुणे स्थानकातील एका भिंतीवर चित्र साकारून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, भविष्यात पुणे विभागातील इतर स्थानकांतही त्या-त्या भागातील ओळख चितारून स्थानकाच्या भिंती सुशोभित करण्यात येणार आहेत.
स्थानकातील वातावरण प्रसन्न राहण्याबरोबरच शहरात येणाऱ्या नागरिकांना पुण्याची सांस्कृतिक व बदलत्या काळानुसार निर्माण झालेली आधुनिक ओळख करून देण्याच्या दृष्टीने स्थानकातील विविध भिंतींवर चित्र साकारण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांची ही कल्पना पुणे स्थानकाला वेगळी ओळख निर्माण करून देणारी व उपयुक्त असल्याने प्रशासनानेही त्याला तातडीने मान्यता दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेले पहिले चित्र स्थानकाच्या प्रतीक्षालयात नुकतेच लावण्यात आले. या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. रेल्वेचे वरिष्ठ उपव्यवस्थापक गौरव झा, महाविद्यालयाचे संचालक रंजना दाणी आदी त्या वेळी उपस्थित होते.
पुण्याची ओळख सांगणारी चित्रे काढण्यासाठी स्थानक व स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक जागा आहेत. त्यामुळे शक्य तितक्या भिंतींवर चित्रे साकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाचा स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी मोठा फायदा होणार आहे. पुढील काळामध्ये या उपक्रमात इतर संस्थाही सहभागी होणार असल्याचे दादाभॉय यांनी सांगितले. पुणे स्थानकाबरोबरच इतर स्थानकातही अशा प्रकारची चित्रे साकारण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमामध्ये रोहित गिरासे, रसिका पवार, स्वरूप कोठारी, निरंजन चक्रवर्ती, पौर्णिमा बडवे, प्रियांका कुरेकर आदी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.