रेल्वेच्या तत्काळ तिकिटांसाठी सकाळी तिकीट खिडकीच्या रांगेत थांबले की अवघ्या काही मिनिटांमध्ये ‘बुकिंग फुल्ल’चा संदेश मिळतो.. रांगेत थांबलेले प्रवासी काहीसा त्रासा व्यक्त करतात, पण नाईलाज असल्याने नाराजी घेऊनच घरी परततात.. दुसरीकडे मात्र कोण्या तरी एजंटकडे हीच तिकिटे थोडा जादा दर घेऊन मिळतात.. तिकिटांचा हा काळाबाजार थांबविण्यासाठी रेल्वेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी सध्या त्या फोल ठरत असल्याच्या दिसत आहेत. कारण काळाबाजारी करणारे नवनवे फंडे शोधून काढत आहेत. राहत्या घरात स्वत:ची यंत्रणा उभी करून ऑनलाईन पद्धतीने तिकीटे काढण्याचा प्रकार नुकताच उजेडात आला. ऑनलाईन बुकिंगमध्ये काळाबाजारीच्या या ‘व्हायरस’मुळे रेल्वेचीही डोकेदुखी वाढली आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वेची तत्काळ तिकिटांची बुकिंगही आता ऑनलाईन करण्यात आली आहे. अनेक अनधिकृत एजंट रेल्वेची तत्काळ तिकिटे बळकावित असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. तत्काळच्या रांगेमध्ये सुरुवातीला एजंटची माणसे थांबत व बनावट कागदपत्रांच्या आधारे तिकिटांची खरेदी करीत होते. हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वेच्या वतीने आता आरक्षण खिडकीवर बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमध्ये एकापेक्षा अधिक वेळा व्यक्ती तिकीट खिडकीवर आल्यास कळू शकते. त्याचप्रमाणे तिकीट खिडकीच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे तत्काळच्या काळाबाजारीला काहीसा आळा बसल्याचे दिसत असतानाच तत्काळ तिकिटांची थेट घरबसल्या बुकिंग होत असल्याचे नवेच प्रकरण उजेडात आले आहे.
राजकुमार वृंदावन यादव हा तिकिटांच्या काळाबाजारीतील एक मोठा ठग पोलिसांच्या हाती लागला. यादव याने तत्काळ तिकिटे काढण्याची यंत्रणा घरातच उभारली होती. रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगचा अर्ज त्याने डाऊनलोड करून घेतला होता. सकाळी बुकिंग सुरू झाल्यानंतर तो युजर आयडी, पासवर्ड आदी सर्व प्रक्रिया रितसर पूर्ण करून एकापाठोपाठ एक तिकिटे बुकिंग करून घेत होता. त्याच्या या करामतीमुळे सामान्य प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होत नव्हती. यादव मात्र मनमानी किमतीमध्ये या तिकिटांची विक्री करीत होता. पूर्वी यादवची माणसे प्रत्यक्ष रांगेत थांबून तिकिटे खरेदी करून ती जादा किमतीने विकत होती. तत्काळ तिकिटे ऑनलाईन झाल्याने त्याने ही नवी शक्कल लढविली. विविध उपाययोजना करूनही काळाबाजार थांबत नसल्याने रेल्वेतील अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मात्र, ही काळाबाजारी फोफावण्यासाठी आतील काही मंडळींचाही सहभाग असू शकतो, असा आरोपही करण्यात येत आहे.
तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनाच थेट तिकिटे मिळावीत, यासाठी या उपाययोजना आहेत. प्रवाशांनी अनधिकृत लोकांकडून तिकिटे खरेदी करू नयेत. ही तिकिटे बनावट कागदपत्रांच्या आधारे असल्याने प्रवासात पकडले गेल्यास कारवाईची नामुष्की ओढावली जाते. त्याचप्रमाणे काही दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित प्रवाशाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा भरपाई मिळू शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनीच या काळाबाजारीच्या तिकिटांबाबत जागरूक झाले पाहिजे.
– वाय. के. सिंह, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग