पाऊस, थंडी आणि उकाडा

यंदाचा नोव्हेंबर महिना हवामानाच्या लहरीपणाचा उत्तम नमुना ठरला असून, या एकाच महिन्यात राज्यातील नागरिकांना तीनही ऋतूंची अनुभूती मिळाली.

नोव्हेंबरमध्ये राज्याला तीनही ऋतूंची अनुभूती

पुणे : यंदाचा नोव्हेंबर महिना हवामानाच्या लहरीपणाचा उत्तम नमुना ठरला असून, या एकाच महिन्यात राज्यातील नागरिकांना तीनही ऋतूंची अनुभूती मिळाली. प्रत्येक आठवडय़ाला हवामानात झपाटय़ाने बदल झाले. समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे पावसाची हजेरी, कोरडय़ा हवामानात उन्हाचा चटका आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे हलक्या थंडीचाही अनुभव या महिन्यात नारिकांनी घेतला.

गेल्या काही वर्षांमध्ये मोसमी पावसाचा कालावधी लांबत असल्याने ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पावसाळी वातावरण कायम असते. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत नसल्याने ऑक्टोबर हीटचा कालावधी यंदाही लुप्त झाला. याच चक्रामध्ये थंडीचा कालावधीही पुढे जातो आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस आणि काही प्रमाणात उकाडय़ाचे वातावरण होते. पण, नोव्हेंबर महिना हवामानाच्या दृष्टीने निराळा ठरला. हवामान अभ्यासकांच्या मते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात वादळे निर्माण होतात. त्यातून चार ते पाच  दिवसांसाठी पावसाळी स्थिती तयार होऊन थंडी गायब होते. मात्र, यंदा काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात दिवाळीच्या कालावधीत राज्याला थंडीची प्रतीक्षा होती. पण, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन दिवाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र असल्याने या काळात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यात काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली भागांतही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी होती. दुसऱ्या आठवडय़ात उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याच्या दिशेने येऊ लागल्याने ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागात रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन थंडी अवतरली. हे वातावरण लगेचच निवळले आणि अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले. याच काळात दिवसाचे कमाल तापमान वाढून उन्हाचा चटका जाणवला. १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अनेक भागांत पाऊस झाला. त्यानंतरच्या काळात रात्री ढगाळ वातावरण राहात असल्याने किमान तापमानात मोठी वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढत गेला. काही भागात हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशांनी अधिक होते. आता महिन्याच्या शेवटच्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होत आहे.

आता तीन दिवस पावसाचे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत काही भागात पावसाची शक्यता आहे. आता तीन दिवस पावसाचे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत काही भागात पावसाची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain cold heat maharashtra season ysh