पाऊस आला की वीज गायब होत असल्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल. काही वेळेला वादळ-वाऱ्यात दक्षता म्हणून वीज बंद केली जाते, तर अनेकदा यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधारात बसावे लागते. त्यामुळे यंदाही ‘येतोय पावसाळा, विजेचा लपंडाव टाळा’ असाच नागरिकांचा सूर आहे. त्यादृष्टीने महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामाला वेग दिला जात आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत प्रामुख्याने वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे लक्षात घेऊन सध्या त्या दृष्टीने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. वीज खांबांवरील करड्या रंगाचे डिस्क इन्सूलेटर (चिमणी) चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते आणि वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो. त्यामुळे खराब झालेले डिस्क व पीन इन्सूलेटर बदलण्यात येत आहेत.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही, परंतु पावसाला सुरुवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. भूमिगत वाहिनी तपासणी यंत्रणेच्या साहाय्याने वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. पावसाळ्यात वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद केला जातो.
धोकादायक फांद्या तोडण्याचे आवाहन
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. यामध्ये विविध ठिकाणी झाडांच्या छोट्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. धोकादायक असलेल्या मोठ्या फांद्यांबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती देण्यात आली आहे. खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची कटाई महापालिकेची परवानगी घेऊन संबंधितांनी करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Heavy rain expected in the next 24 hours
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क करा
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर २४ तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ तसेच १९१२ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीचा दूरध्वनी किंवा मोबाइलद्वारे वीजग्राहकांना संपर्क साधता येतो. वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोयही या माध्यमातून उपलब्ध असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.