पुणे : पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण ,गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसभरात राज्यात सोलापूर आणि अमरावती वगळता अन्य ठिकाणी पाऊस पडलेला नाही.

राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे. अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही. आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सोलापूरात २२ मिलिमीटर, तर अमरावतीमध्ये सात मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक तापमान ३४ अंश सेल्सिअस अकोल्यात, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राबरोबरच विदर्भ तसेच मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.