मोसमी पावसाची पुन्हा हूल!

मोसमी पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागाला पुन्हा हूल दिली असून, आता ६ जुलैऐवजी ११ जुलैच्या सुमारास त्याचे पुनरागमन होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

मोसमी पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागाला पुन्हा हूल दिली असून, आता ६ जुलैऐवजी ११ जुलैच्या सुमारास त्याचे पुनरागमन होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्याला निमित्त झाले आहे, प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या तीव्र चक्रीवादळाचे. त्या वादळाचा जोर ओसरल्यानंतरच म्हणजे पुढील आठवडय़ाच्या उत्तरार्धात आपल्याकडे पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह देशाच्या ९१ टक्के क्षेत्रावर पावसाची अवकृपा झाली असून, या सर्व क्षेत्रावर अपुरा पाऊस पडला आहे.
या वेळच्या पावसाने हवामान विभागाचे अंदाज वेळोवेळी धुडकावून लागले. देशात ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज पहिल्या टप्प्यात वर्तविण्यात आला होता. तो बदलून दुसऱ्या टप्प्यात ९३ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला. त्यानंतर आता पाऊस कधी सक्रिय होणार, याबाबतही हवामान विभागाचे अंदाज फसले आहेत. संपूर्ण जून महिन्यातील असमाधानकारक पावसानंतर ५/६ जुलैच्या आसपास पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आतासुद्धा हा अंदाज खोटा ठरवत पावसाने हूल दिली आहे. हवामान विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ११ जुलैच्या आसपास पाऊस सक्रिय होण्याच्या आशा आहेत. तोवर किनारपट्टीवर काही प्रमाणात पाऊस पडेल. मात्र, अंतर्गत भागात मोठय़ा प्रमाणात पावसाची शक्यता नाही.
दरम्यान, देशभरात पावसाची स्थिती अतिशय बिकट बनली आहे. महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये १ जून ते आतापर्यंत अतिशय अपुरा पाऊस पडला आहे. कोकणात सरासरीच्या केवळ ३५ टक्के, मध्य महाराष्ट्रात २८ टक्के, मराठवाडय़ात केवळ २० टक्के, तर विदर्भात ३४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या इतर भागातही स्थिती काहीशी अशीच  आहे. देशातील हवामानाच्या ३६ पैकी ३१ उपविभागांमध्ये असाच अपुरा पाऊस पडला आहे. हे ३१ उपविभाग देशाचे तब्बल ९१ टक्के क्षेत्र व्यापतात.
आताची स्थिती कशामुळे?
आताचा पाऊस लांबण्याची स्थिती उद्भवण्यास प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे कारण दिले जात आहे. सध्या प्रशांत महासागरात न्यूगुरी नावाचे चक्रीवादळ (टायफून) निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आपल्याकडील मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवाह बिघडला आहे. हे चक्रीवादळ जमिनीवर पोहोचल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवाह पुन्हा जुळून येईल. त्याला साधारणपणे ११ जुलै ही तारीख उजाडेल. याशिवाय अरबी समुद्रात अँटीसायक्लॉन स्थिती आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांना सक्रिय होण्यास बळकटी मिळत नाही. ही स्थिती बदलली तर पाऊस सक्रिय होण्यास मदत होईल, असे हवामान विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
धरणांनी तळ गाठला
राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या धरणांमध्ये सध्या एकूण १८ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यातही पुणे विभाग (१२ टक्के), नाशिक विभाग (१३ टक्के) आणि मराठवाडा (१६ टक्के) यांची स्थिती अधिक बिकट आहे. बहुतांश शहरांमध्ये पाणीकपात सुरू आहे, तर ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी पुरवणे बंद आहे. वीजनिर्मितीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणात ८ टक्के पाणी उरले आहे, तर भीमेवरील उजनी धरणात उपयुक्त साठा शून्य टक्के आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rain deceive cyclone monsoon

ताज्या बातम्या