पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या हंगामाचा शेवटच्या टप्पा आला असतानाही देशातील १५ राज्ये आणि १८५ जिल्ह्यांत अद्यापही पाऊस सरासरी गाठू शकलेला नाही. महाराष्ट्राने पावसाची सरासरी पूर्ण केली असली, तरी शेजारील गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आदींसह उत्तर-पूर्व आणि उत्तर-दक्षिण भागातील अनेक राज्यांमध्ये पावसाची चिंता कायम आहे. राजस्थानसारख्या राज्यात पाऊस सरासरी पूर्ण करीत असताना सर्वाधिक पावसाच्या उत्तर-पूर्व राज्यांत यंदा पाऊस कमी आहे.

हंगामाच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये देशाच्या विविध भागांत पाऊस झाला. जुलैमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये मात्र महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली होती.

 गुजरात, केरळबरोबरच मध्य भारत आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत पावसाने या काळात दीर्घ विश्रांती घेतली होती. सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे काही प्रमाणात पावसाची सरासरी भरून निघाली असली, तरी अद्यापही सुमारे १५ राज्यांत पाऊस सरासरी पूर्ण करू शकलेला नाही.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सर्वाधिक २८ जिल्ह्यांत पाऊस सरासरीच्या मागे आहे. गुजरातमध्ये ३३ पैकी १७ जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. मध्य प्रदेशातील १०, तर जम्मू-काश्मीरमधील १२ जिल्हे पावसात मागे पडले आहेत. अरुणाचल प्रदेशातील १० आणि आसाममधील १२ जिल्ह्यांमध्येही पाऊस कमी आहे.  सर्वांत कमी पाऊस मणिपूरमध्ये ६० टक्के उणा आहे. त्यापाठोपाठ गुजरात, जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आदी राज्यांत पाऊस २० ते २८ टक्क्यांनी उणा आहे.

राज्यात दोन दिवस पाऊस

महाराष्ट्रात बहुतांश भागांत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत २१, २२ सप्टेंबरला काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतही या काळात पाऊस असेल.