scorecardresearch

पुणे: आणखी चार दिवस पावसाचे राज्याच्या काही भागांत हलक्या सरींचा अंदाज

राज्याच्या काही भागांत पुढील चार दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

rain in pune
आणखी चार दिवस पावसाचे राज्याच्या काही भागांत हलक्या सरींचा अंदाज

राज्याच्या काही भागांत पुढील चार दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये २५ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मागील आठवडय़ात राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे सावट ओसरले असून कमाल तापमानात साधारण चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी मुंबईत जोरदार पाऊस झाला. नंतर पुण्यात दाखल झालेल्या पावसाने दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. सकाळपासून शहरात आकाश ढगाळ राहिले.

दुपारी दीड-दोननंतर बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश पहायला मिळाले. कोथरुड, डेक्कन, वारजे, कर्वेनगर, बावधन, बाणेर, पेठांचा परिसर अशा सगळय़ा परिसरात सुमारे अध्र्या तासाहून अधिक काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, मात्र वादळी वारे, मेघगर्जना झाली नाही. मंगळवारी पुणे, नाशिक, सातारा, मुंबई, महाबळेश्वर येथील तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले दिसून आले. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

कारण काय?
पश्चिमेकडून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मंगळवारी सकाळी मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाला. पुढील काही दिवस हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमानामध्ये तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर तापमान स्थिर राहील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 02:10 IST

संबंधित बातम्या